'ऑपरेशन सिंदूर' सिनेमाचं पोस्टर पाहून भडकले नेटकरी, दिग्दर्शकाने माफी मागत दिले स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 15:47 IST2025-05-10T15:47:04+5:302025-05-10T15:47:49+5:30

'ऑपरेशन सिंदूर' सिनेमाचं पोस्टर काल ९ मे रोजी सोशल मीडियावर शेअर करण्यात आलं.

netizens furious on operation sindoor film announcement director appologized and gave clarification | 'ऑपरेशन सिंदूर' सिनेमाचं पोस्टर पाहून भडकले नेटकरी, दिग्दर्शकाने माफी मागत दिले स्पष्टीकरण

'ऑपरेशन सिंदूर' सिनेमाचं पोस्टर पाहून भडकले नेटकरी, दिग्दर्शकाने माफी मागत दिले स्पष्टीकरण

भारताने 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) च्या माध्यमातून पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. यानंतर सगळीकडे भारतीय सैन्याचं कौतुक झालं. सैन्याच्या कामगिरीने सर्वांचीच मान अभिमानाने उंचावली. पहलगाम येथे मृत्यू पावलेल्या सर्व पर्यटकांना हीच श्रद्धांजली होती. या 'ऑपरेशन सिंदूर'वरसिनेमा बनवण्यासाठी मेकर्समध्ये चढाओढ सुरु झाली. काही दिवसांपूर्वीच 'ऑपरेशन सिंदूर' सिनेमाची घोषणाही करण्यात आली. याचं पोस्टर समोर येताच नेटकरी चांगलेच भडकले. लोकांनी फिल्ममेकर्सच्या हेतूवर प्रश्न उपस्थित केले. यानंतर आता सिनेमाच्या दिग्दर्शकाने सर्वांची माफी मागितली आहे.

'ऑपरेशन सिंदूर' सिनेमाचं पोस्टर काल ९ मे रोजी सोशल मीडियावर शेअर करण्यात आलं. उत्तम माहेश्वरी सिनेमा दिग्दर्शित करणार असून विकी भगनानी फिल्म्स आणि द कंटेंट इंजिनिअर याची निर्मिती करणार आहेत. पोस्टर समोर येताच याला चांगलाच विरोध झाला. देश इतक्या गंभीर स्थितीतून जात असताना यावर सिनेमा बनवणं खूप असंवेदनशील आहे अशा प्रतिक्रिया आल्या. तसंच हे पोस्टर ए आय जनरेटेड असल्याचं बोललं गेलं. 

यावर विरोध वाढत असतानाच आता दिग्दर्शक उत्तम माहेश्वरी यांनी सार्वजनिकरित्या माफी मागितली आहे. त्यांनी सोशल मीडियावर लांबलचक पोस्ट शेअर करत लिहिले, "मी भारतीये सैन्याच्या 'ऑपरेशन सिंदूर'वर प्रेरित होऊन त्यावर सिनेमाची घोषणा केली त्यासाठी माफी मागतो. मला कोणाच्याही भावना दुखवायच्या नव्हत्या. एक फिल्ममेकर म्हणून भारतीय सैन्याची शौर्यगाथा मोठ्या पडद्यावर यावी असं मला वाटलं. भारतीय सैन्यावरील आपलं प्रेम आणि आदर या भावनेतूनच सिनेमाची घोषणा केली. पैसा आणि प्रसिद्धी हा त्यामागचा हेतू नव्हता."

मी समजू शकतो की अशा प्रसंगी सिनेमाची घोषणा केल्याने अनेक लोक नाराज आहेत. म्हणूनच मी माफी मागतो. हा फक्त सिनेमा नाही तर संपूर्ण देशाची भावना आहे. आपल्या आर्मीने आणि पंतप्रधान मोदींनी सर्वांना गर्व वाटेल असं काम केलं आहे."

Web Title: netizens furious on operation sindoor film announcement director appologized and gave clarification

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.