नेटफ्लिक्सला भारतातून 'इतक्या' हजार कोटींचा फायदा, टेड सारंडोस यांनी उघड केला आकडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2025 13:33 IST2025-05-04T13:19:39+5:302025-05-04T13:33:11+5:30
नेटफ्लिक्स भारतात हिट! टेड सारंडोस यांनी सांगितला नफ्याचा आकडा

नेटफ्लिक्सला भारतातून 'इतक्या' हजार कोटींचा फायदा, टेड सारंडोस यांनी उघड केला आकडा
नेटफ्लिक्स ही जगभरातील एक अग्रगण्य OTT (Over-the-Top) प्लॅटफॉर्म आहे. यावर प्रेक्षकांना थिएटरमध्ये रिलीज झालेल्या चित्रपटांसह नवीन चित्रपट आणि वेब सीरिज घरबसल्या पाहायला मिळतात. भारतातनेटफ्लिक्सची मोठी क्रेझ आहे. हे एक अतिशय लोकप्रिय स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म आहे. २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'सेक्रेड गेम्स' या वेबसीरिजनंतर अनेकांनी आपला मोर्चा नेटफ्लिक्सकडे वळवला. पण, जेव्हा २०२० मध्ये कोविड साथरोग आला तेव्हा लोकांना घरातून बाहेर पडणं अशक्य झालं होतं. याच काळात नेटफ्लिक्स आवडणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली. आज भारतात कित्येक लोकांकडे नेटफ्लिक्सचं सब्सक्रिप्शन आहे. नेटफ्लिक्सला भारतातून हजार कोटींचा फायदा झाला आहे. याची माहिती खुद्द नेटफ्लिक्सचे सिईओ टेड सारंडोस यांनी उघड केली आहे.
नेटफ्लिक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी टेड सारंडोस यांनी 'वेव्हज' परिषदेत सहभागी झाले होते. यावेळी शनिवारी झालेल्या या परिषदेत अभिनेता सैफ अली खान याने टेड सारंडोस यांच्याशी संवाद साधला. यावेळी भारतातील नेटफ्लिक्सच्या नफ्याबद्दल सारंडोस यांनी खुलासा केला. २०२१ ते २०२४ या कालावधीत नेटफ्लिक्सने भारतातून जवळपास २०० कोटी डॉलर्स (१६,००० कोटी रुपये) इतका नफा कमावला आहे, असं त्यांनी नमूद केलं.
२० हजार कलाकार-तंत्रज्ञांना रोजगार
सारंडोस यांनी सांगितलं की, या यशाचा थेट फायदा भारतीय निर्मिती संस्थांना आणि तंत्रज्ञ वर्गाला झाला आहे. आतापर्यंत १५० पेक्षा जास्त भारतीय वेबसीरिज आणि चित्रपटांची निर्मिती करण्यात आली आहे. ९० हून अधिक शहरांमध्ये चित्रीकरण झालं आहे. या माध्यमातून जवळपास २० हजारांहून अधिक कलाकार आणि तंत्रज्ञांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.
जगभरात पोहचलं भारतीय कटेंट
नेटफ्लिक्सवर गेल्या वर्षी जगभरातील प्रेक्षकांनी ३ अब्ज तासांहून अधिक भारतीय आशय पाहिला. दर आठवड्याला प्रदर्शित होणाऱ्या टॉप १० वेबमालिकांमध्ये एक तरी भारतीय सीरिज असतेच", असंही सारंडोस यांनी सांगितलं. तसेच त्यांनी भारतीयांना आपल्या मातीतल्या कहाण्यांवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला. कारण जागतिक प्रेक्षकांमध्ये याच कथा अधिक प्रभावी ठरत असल्याचं त्यांनी म्हटलं. तर 'सेक्रेड गेम्स'पासून सुरू झालेला प्रवास आज नेटफ्लिक्ससाठी केवळ यशाचाच नव्हे, तर भारतीय मनोरंजनसृष्टीला जागतिक व्यासपीठ मिळवून देणारा क्षणही ठरला आहे.