ट्रेलर लाँच आधीच नाना पाटेकर निघून गेले; विशाल भारद्वाज म्हणाले, 'आम्हाला वाईट वाटलं नाही कारण...'
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 09:58 IST2026-01-22T09:56:27+5:302026-01-22T09:58:32+5:30
नाना पाटेकर संतापले, सिग्नेचर स्टाईलमध्ये उठून निघून गेले

ट्रेलर लाँच आधीच नाना पाटेकर निघून गेले; विशाल भारद्वाज म्हणाले, 'आम्हाला वाईट वाटलं नाही कारण...'
विशाल भारद्वाज दिग्दर्शित 'ओ रोमिओ'चा काल ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. यावेळी शाहिद कपूर, तृप्ती डिमरी, अविनाश तिवारी, फरिदा जलाल साजिद नाडियादवाला यांची उपस्थिती होती. सिनेमात नाना पाटेकरांचीही मुख्य भूमिका आहे. ट्रेलर लाँचसाठी नाना पाटेकर स्वत:ही आले होते. मात्र इतर टीमला दीड तास उशीर झाल्याने नाना संतापले. ते रागारागात लाँचआधीच निघून गेले. यानंतर आता दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.
दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांच्या आगामी 'ओ रोमिओ'चा काल ट्रेलर रिलीज झाला. शाहिदच्या स्टाईल, लूक आणि अॅटिट्यूडने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. तर दुसरीकडे नाना पाटेकरांनाही पुन्हा गँगस्टर अंदाजात पाहून चाहते खूश झाले. कालच्या ट्रेलर लाँचलाही ते आले होते. मात्र इतर कलाकार वेळेत पोहोचले नाहीत. त्यांनी दीड तास उशीर झाल्यावर नाना पाटेकर संतापले आणि निघून गेले. यानंतर ट्रेलर लाँच सुरु झाला तेव्हा होस्टने नाना पाटेकरांचं नाव घेतलं. तेव्हा विशाल भारद्वाज म्हणाले, "नाना इथून निघून गेले आहेत. पण त्यांच्याविषयीही बोललं पाहिजे. त्यांच्या आतमध्ये एक खोडकर मुलगा आहे दडला आहे जो सर्वांचं मनोरंजनही करतो. ज्याच्यासोबत सगळ्यांनाच राहायचं असतं असे नाना आहेत. आमची २७ वर्षांची मैत्री आहे पण पहिल्यांदाच आम्ही एकत्र काम केलं आहे."
ते पुढे म्हणाले, "नाना इथे असते तर मजा आली असती. पण ते आपल्या सिग्नेचर स्टाईलमध्ये उठले, 'एक तास मला वाट पाहायला लावली..आता मी जातोय' असं म्हणाले आणि निघून गेले. आम्हाला याचं अजिबातच वाईट वाटलं नाही कारण जसं की आपल्या सगळ्यांनाच माहितीये की हीच गोष्ट नानांना नाना पाटेकर बनवते."
'ओ रोमिओ' १३ फेब्रुवारी रोजी रिलीज होणार आहे. यामध्ये शाहिद कपूर, तृप्ती डिमरी, नाना पाटेकर यांच्यासह विक्रांत मेस्सी, तमन्ना भाटिया, दिशा पटानी आणि अविनाश तिवारी या तगड्या कलाकारांच्या भूमिका आहेत. विशाल भारद्वाज आणि शाहिद कपूर यांनी यापूर्वी 'कमीने' आणि 'हैदर' सारखे क्लासिक चित्रपट दिले आहेत. आता 'ओ रोमियो'च्या माध्यमातून ही जोडी तिसऱ्यांदा एकत्र आली आहे. तर नाना आणि शाहिद 'पाठशाला' सिनेमानंतर पुन्हा एकत्र काम करत आहेत