रोहित आर्यामुळे मुंबई हादरली! यामीच्या सिनेमातील कथेसारखं सेम टू सेम किडनॅपिंग, तुम्ही पाहिलाय का 'तो' चित्रपट?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 14:02 IST2025-10-31T14:01:39+5:302025-10-31T14:02:04+5:30
पवई किडनॅपिंग आणि यामी गौतमच्या सस्पेन्स थ्रिलर सिनेमाच्या कथानकात धक्कादायक साम्य आहे.

रोहित आर्यामुळे मुंबई हादरली! यामीच्या सिनेमातील कथेसारखं सेम टू सेम किडनॅपिंग, तुम्ही पाहिलाय का 'तो' चित्रपट?
Rohit Arya Kidnapped 17 Children Like In A Thursday Movie : मुंबईसारख्या महानगरात गुरुवारी (३० ऑक्टोबर) घडलेल्या एका घटनेनं सर्वांनाच मोठा धक्का दिला. पवईसारख्या हाय प्रोफाईल परिसरात एका व्यक्तीने तब्बल १७ लहानग्यांसह दोन ज्येष्ठ नागरिकांना ओलीस ठेवलं आणि या संपूर्ण शहरात काही तासांसाठी भीतीचं वातावरण निर्माण झालं. पण, मुंबई पोलिसांनी धैर्याने कारवाई करत मुलांना सुखरूप सोडवलं. ३८ वर्षीय रोहित आर्या पोलिसांच्या गोळीबारात जखमी झाला आणि नंतर रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणाचं कनेक्शन बॉलिवूडच्या एका सुपरहिट थ्रिलर सिनेमाशी जोडलं जात आहे.
हे प्रकरण घडताच सोशल मीडियावर यामी गौतमचा एक चित्रपट चर्चेत आला आहे. 'अ थर्सडे' असं त्या चित्रपटाचं नाव आहे. यामीचा हा चित्रपट २०२२मध्ये प्रदर्शित झाला होता. पवईतील आरोपी रोहित आर्या याच्या कृतीमध्ये आणि सिनेमाच्या कथानकात धक्कादायक साम्य आहे. जसं सिनेमात यामी गौतम (नैना) तिच्या प्ले स्कूलमधील मुलांना ओलीस ठेवते.तसंच पवईत रोहित आर्यानं ऑडिशनसाठी आलेल्या मुलांना ओलीस ठेवलं. सर्वात मोठा योगायोग म्हणजे, सिनेमात किडनॅपिंगचा दिवस गुरुवार असतो आणि पवईतही ही घटना गुरुवारीच घडली.
सिनेमाची कथा
नैना (यामी गौतमी) ही एका बालवाडी शाळेची (प्ले ग्रुप) शिक्षिका असते. ती, अचानक शाळेतील लहान मुलांना ओलिस ठेवते. स्वतःच पोलिसांना या संर्दभात माहिती देते. या कृत्यामुळे सरकार आणि समाज (मुलांचे पालक, वृत्तवाहिन्या, राजकारणी) खडबडून जागे होतात. नैनाच्या काही मागण्या असतात. तसंच तिला देशाच्या पंतप्रधानांना प्रत्यक्ष भेटायचं असतं. नैनाची मागणी असते की, तिला देशाच्या पंतप्रधानांशी थेट भेटून बोलायचे आहे. यानंतर पोलीस, पंतप्रधान आणि नैना यांच्यात सुरू होणारा हाय व्होल्टेज ड्रामा आणि तिची नेमकी मागणी काय आहे, याचा थरार 'अ थर्सडे' मध्ये अत्यंत चांगल्या प्रकारे दाखवला आहे. या चित्रपटात डिंपल कपाडिया, नेहा धुपिया आणि अतुल कुलकर्णी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. तथापि, यामी गौतमचा अभिनय खूप दमदार होता. तुम्हालाही सस्पेन्स थ्रिलर चित्रपट पाहायला आवडत असतील, तर हा सिनेमा तुम्ही जिओ हॉटस्टारवर नक्की पाहू शकता.

This Thursday won't be an ordinary day. One ordinary woman will change the fate of the entire nation. #DisneyPlusHotstarMultiplex#AThursday#AThursdayOnHotstar - Streaming from 17th Feb! pic.twitter.com/5FYfihMkHJ
— JioHotstar (@JioHotstar) February 10, 2022
पवईतीली घटना
पवईच्या आरए स्टुडिओमध्ये गुरुवारी ऑडिशन सुरू होते. त्यात १०० हून अधिक मुलांना ऑडिशनसाठी बोलावले होते. मात्र त्याआधीच स्टुडिओत पोहचलेल्या १७ मुले आणि दोन ज्येष्ठ नागरिकांना ओलीस ठेवण्यात आले होते. ओलीस ठेवलेल्या मुलांचे वय १५ वर्षाखालील होते. मुलांना ओलीस ठेवल्यानंतर रोहित आर्याचा एक व्हिडीओ समोर आला होता. त्यात तो म्हणाला की, मला आत्महत्या करायची नाही, मी दहशतवादी नाही. माझ्या काही मागण्या आहेत. त्यासाठी मी या मुलांना ओलीस ठेवले आहे. मी एकटा नाही. माझ्यासोबत आणखी काही लोक आहेत. मला कुठल्याही प्रकारे नुकसान पोहचवण्याचा प्रयत्न केला तर मी संपूर्ण इमारतीला आग लावू शकतो अशी धमकी त्याने दिली होती. या घटनेची माहिती मिळतात पोलीस संपूर्ण यंत्रणेसह तिथे पोहचले. त्यांनी मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहितसोबत चर्चेचा प्रयत्न केला. त्याचवेळी काही पोलीस शिताफीने बाथरूमच्या खिडकीतून आतमध्ये पोहचले आणि आरोपी रोहितला तात्काळ अटक करण्यात आली.

