'हा' मराठी चित्रपट पाहून भारावली मृणाल ठाकूर, दिग्दर्शक आणि कलाकारांचं केलं भरभरून कौतुक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 11:57 IST2025-10-28T11:57:03+5:302025-10-28T11:57:26+5:30
अलिकडेच मृणाल ठाकुरनं एक मराठी चित्रपट पाहिला आणि ती भारावून गेली. तिनं दिग्दर्शक आणि कलाकारांचं भरभरुन कौतुक केलं. तसेच प्रेक्षकांना तो चित्रपट पाहण्याची विनंती केली आहे.

'हा' मराठी चित्रपट पाहून भारावली मृणाल ठाकूर, दिग्दर्शक आणि कलाकारांचं केलं भरभरून कौतुक!
टेलिव्हिजनच्या छोट्या पडद्यावरून आपल्या अभिनयाची सुरुवात करून बॉलिवूड आणि साऊथच्या मोठ्या पडद्यावर यशस्वी झेप घेणारी अभिनेत्री म्हणजे मृणाल ठाकूर. मालिकांमधून घराघरांत पोहोचल्यानंतर, 'सीता रामम', 'बाटला हाऊस', 'जर्सी' आणि 'सुपर ३०' सारख्या चित्रपटांनी तिला राष्ट्रीय स्तरावर एक मजबूत ओळख मिळवून दिली आहे. मुळची धुळ्याची असलेली ही मराठमोळी मृणाल ठाकुर अनेकदा मराठी कलाकारांप्रती आपलं प्रेम आणि आदर व्यक्त करताना दिसते. अलिकडेच मृणाल ठाकुरनं एक मराठी चित्रपट पाहिला आणि ती भारावून गेली. तिनं दिग्दर्शक आणि कलाकारांचं भरभरुन कौतुक केलं. तसेच प्रेक्षकांना तो चित्रपट पाहण्याची विनंती केली आहे.
मृणालनं नुकतंच 'दशावतार' हा चित्रपट पाहिलाय. चित्रपट पाहिल्यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना मृणाल म्हणाली, "मी नुकताच 'दशावतार' हा अप्रतिम सिनेमा पाहिला आणि मला इतकं बरं वाटलं की, इतक्या दिवसांनी, नव्हे वर्षांनी, मला सिनेमात मराठी संस्कृती आणि आपलं कोकण पाहायला मिळालं. हा चित्रपट कुडाळमध्ये शूट झाला आहे. असं बिलकूल वाटत नाहीये की सुबोध खानोलकरचा हा पहिलाच चित्रपट आहे. संपूर्ण टीमचं अभिनंदन. फार मज्जा आली".
चित्रपटाच्या विषयावर बोलताना मृणालनं म्हटलं, "'दशावतार'मध्ये दाखवण्यात आलेले सगळे अवतार, म्हणजे आज आपल्या अवतीभवती जे काही चालू आहे, ती परिस्थिती कलाकृतीतून मांडणं गरजेचं आहे. हा चित्रपट तुम्ही थिएटरमध्ये नक्की पाहा. कारण, या सिनेमातून खूप काही शिकायला मिळेल. तसेच चित्रपटातील ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या अभिनयाचं कौतुक करताना मृणालनं त्यांना 'लेजेंड' संबोधलं. ती म्हणाली, "दिलीपकाका, तुम्ही तर लेजेंड आहात. पडद्यावर तुम्ही जी जादू निर्माण करता ते कोणी करू शकत नाही. हा चित्रपट खूप पुढे जावा अशी माझी इच्छा आहे".
या चित्रपटाचे कौतुक केवळ मराठी प्रेक्षकांकडूनच नाही, तर इतर भाषिक इंडस्ट्रीतूनही होत आहे, याबद्दलही मृणालनं आनंद व्यक्त केला. ती म्हणाल्या, "मल्याळम इंडस्ट्रीतही या सिनेमाचं खूप कौतुक होत आहे. अनेक मल्याळम प्रेक्षक 'दशावतार'चं कौतुक करीत आहेत". शेवटी मृणालनं प्रेक्षकांना आवाहन केले की, "मला वाटतं प्रत्येकानं हा चित्रपट पाहावा. कारण, सिनेमातले अनेक सीन, लोकेशन्स, सिनेमाची गाणी, नृत्य, दिग्दर्शन अशा अनेक गोष्टी या सिनेमात आहेत. मला काही गोष्टी माहीत नव्हत्या, त्या या सिनेमामुळे मला कळल्या. त्यामुळे 'दशावतार' नक्की पाहा".