हर हर गंगे! महाकुंभमेळ्यात पोहोचला मिलिंद सोमण, पत्नीसोबत केलं पवित्र स्नान
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 09:23 IST2025-01-30T09:22:57+5:302025-01-30T09:23:07+5:30
अभिनेत्याने महाकुंभमेळ्याचा खास अनुभव घेतला आहे.

हर हर गंगे! महाकुंभमेळ्यात पोहोचला मिलिंद सोमण, पत्नीसोबत केलं पवित्र स्नान
Maha Kumbh 2025: भारतातील सर्वात महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांपैकी एक असणाऱ्या प्रयागराज याठिकाणी अत्यंत दुर्मीळ असा महाकुंभमेळा सुरू आहे. देशभरातून भाविक या कुंभमेळ्यात सहभागी होत आहेत. अनेक सेलिब्रिटीही कुंभमेळ्यात सहभागी होत दर्शन घेत आहेत. या कुंभमेळ्याचा अनुभव घ्यावा अशी इच्छा अनेकांची असते. अभिनेता मिलिंद सोमण (Milind Soman At Mahakumbh) याची हीच इच्छा पूर्ण झाली. त्यानं पत्नीसह महाकुंभमेळ्याचा अनुभव घेतला. ज्याचे फोटो समोर आले आहेत.
महाकुंभात पोहोचलेल्या मिलिंद आणि अंकिता यांनीही अत्यंत भक्तीभावाने संगमात स्नान केले. दोघांनीही तिथे पूजा केली. या जोडप्याने हात जोडून देवाला प्रार्थना केली. अंकिताने तिच्या इंस्टाग्रामवर हे सुंदर फोटो शेअर केले आहेत. कॅप्शनमध्ये तिनं लिहलं, "या क्षणी माझे मन किती भरले आहे, हे सांगण्यासाठी शब्द नाहीत. मौनी अमावस्येच्या शुभ मुहूर्तावर महाकुंभमेळ्याला येण्याची संधी मिळणे माझ्या आकलनाच्या पलीकडे आहे. हे असे क्षण आहेत जे तुम्हाला आपल्या अत्यंत क्षुल्लक अस्तित्वाचं महत्त्व जाणवून देतात. काल रात्री ज्यांनी चेंगराचेंगरीच्या घटनेत आपल्या प्रियजनांना गमावलं त्यांच्याप्रती मी संवेदना व्यक्त करते. सर्वांना शांती मिळो. हर हर महादेव".
गेल्या १३ जानेवारीपासून सुरू झालेला हा महाकुंभमेळा पुढचे ४५ दिवस म्हणजेच २६ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. दर १२ वर्षांनी कुंभमेळा येतो, पण यावेळी तो अधिक विशेष आहे. कारण १४४ वर्षांनंतर निर्माण होणाऱ्या दुर्मीळ ग्रहस्थितीमुळे या महाकुंभमेळ्याचे अधिक महत्त्व आहे. कुंभमेळ्यात स्नान करण्याची संधी मिळणे भाग्याचे समजले जाते. 'महाकुंभ'ची दिव्यता दाखवण्यासाठी उत्तर प्रदेश सरकार अनेक प्रयत्न करत आहे. दिग्गज व्यक्तिमत्वांची आणि नेत्यांची उपस्थिती यंदा महाकुंभची शोभा वाढवत आहे.