Mayasabha Teaser: हे काहीतरी अद्भूत आहे! 'तुंबाड'च्या दिग्दर्शकाचा दुसरा सिनेमा 'मयसभा'चा जबरदस्त टीझर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 14:06 IST2026-01-14T13:52:01+5:302026-01-14T14:06:22+5:30
मराठमोळी अभिनेत्री वीणा जामकर या सिनेमात प्रमुख भूमिकेत आहे. मास्क लावलेला कलाकार कोण? जाणून घेण्यासाठी लिंंकवर क्लिक कर

Mayasabha Teaser: हे काहीतरी अद्भूत आहे! 'तुंबाड'च्या दिग्दर्शकाचा दुसरा सिनेमा 'मयसभा'चा जबरदस्त टीझर
आगामी हिंदी फिल्म ‘मयसभा – द हॉल ऑफ इल्यूजन’ चा अधिकृत टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट दिग्दर्शक राही अनिल बर्वे यांचा दुसरा दिग्दर्शकीय प्रयत्न असून, त्यांच्या गाजलेल्या ‘तुंबाड’ नंतरचा हा बहुप्रतिक्षित प्रोजेक्ट आहे. कथानक मांडण्याची वैशिष्ट्यपूर्ण शैली, भव्य कल्पना आणि कलाकारांचा दमदार अभिनय यामुळे राही यावेळीही एक भन्नाट अनुभव घेऊन येणार यात शंका नाही.
‘मयसभा'च्या टीझरमधून कथेचा काहीच अंदाज बांधता येत नाही. ''माती माणसाला म्हणते- आता मी तुला कसणार'' हा संवाद भयावह बॅकग्राऊंडला ऐकायला मिळतो. त्यानंतर एका टेबलवर जावेद जाफरी, वीणा जामकर, दीपक दामले, मोहम्मद समद हे कलाकार जेवताना दिसतात. त्यांच्या चेहऱ्यावर असलेले हावभाव काहीसे रहस्यमयी आहेत. पुढे मुंबईच्या रस्त्यांवरील रिअल लोकेशन दिसतात. अशाप्रकारे केवळ एक मिनिटांच्या या टीझरने प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण करण्यात यश मिळवलं आहे.
'मयसभा' या चित्रपटाची निर्मिती झिरकॉन फिल्म्स अंतर्गत गिरीश पटेल आणि अंकूर जे. सिंग यांनी केली असून, सहनिर्माते म्हणून शंमराव भगवान यादव, चंदा यादव, केवल हांडा आणि मनीष हांडा यांचा सहभाग आहे. हा चित्रपट पिकल एंटरटेनमेंट (समीर दीक्षित आणि ऋषिकेश भिरंगी यांच्या नेतृत्वाखाली) यांच्यामार्फत, UFO Cine Media Network यांच्या सहकार्याने सादर व वितरित केला जात आहे. हा चित्रपट संपूर्ण भारतात ३० जानेवारी २०२६ रोजी प्रदर्शित होत असून या चित्रपटाची प्रचंड उत्सुकता आहे.