सिनेसृष्टीवर शोककळा! 'मेरी कॉम' फेम अभिनेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, वयाच्या ६८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 14:32 IST2026-02-07T14:28:44+5:302026-02-07T14:32:33+5:30
'मेरी कॉम'फेम अभिनेते सुनील थापा यांचे निधन, चाहते शोकमग्न

सिनेसृष्टीवर शोककळा! 'मेरी कॉम' फेम अभिनेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, वयाच्या ६८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Sunil Thapa Passes Away: मनोरंजन विश्वातून एक दु:खद बातमी समोर आली आहे. 'मेरी कॉम' चित्रपटात प्रियंका चोप्राच्या प्रशिक्षकाची भूमिका साकारणारे अभिनेते सुनील थापा यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. वयाच्या ६८ व्या वर्षी त्यांची प्राणज्योती मालवली आहे. त्यांच्या निधनाची बातमी समजताच चाहत्यांना धक्का बसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुनील थापा यांना बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यानंतर काठमांडूच्या थापाथली येथील नॉर्विक रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. डॉक्टरांनी सकाळी ७:४४ वाजता ईसीजी तपासणी केली असता त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
अभिनेते सुनील थापा हे बॉलिवूडमधील एक लोकप्रिय चेहरा होते. सुनील थापा यांच्या निधनाची बातमी कळताच त्यांच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांनी बॉलिवूडमधून आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात केली. त्यांनी आपल्या कारकिर्दीत बॉलिवीडसह भोजपुरी चित्रपटांमध्ये मोठ्या प्रमाणात काम केले आहे. इतकंच नाहीतर त्यांनी जवळपास ३०० हून अधिक नेपाळी चित्रपटांमध्ये अभिनय केला.नेपाळी सिनेसृष्टीतील सर्वात प्रसिद्ध खलनायक म्हणून ते ओळखले जायचे. सुनील थापा यांनी मेरी कॉम चित्रपटात प्रियांका चोप्राच्या प्रशिक्षकाची भूमिका साकारली होती.
नेपाळी, हिंदी आणि भोजपुरी चित्रपटसृष्टीत महत्त्वपूर्ण योगदान देणारे सुनील थापा यांनी स्वतःची फिल्म अकादमी देखील आहे. एव्हरेस्ट फिल्म अकादमीचे अध्यक्ष म्हणूनही ते कार्यरत होते.सुनील थापा केवळ एक चांगले अभिनेतेच नव्हते, तर व्यावसायिक फुटबॉलपटू आणि फोटो जर्नलिस्ट देखील होते.