"लग्नाला एक्सपायरी डेट असावी, कारण..."; काजोलचं मोठं विधान, विवाहसंस्थेबद्दल मांडले स्पष्ट विचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 16:47 IST2025-11-12T16:46:27+5:302025-11-12T16:47:12+5:30
बॉलिवूड अभिनेत्री काजोलने लग्न आणि विवाहसंस्थेबद्दल तिचे स्पष्ट आणि थेट विचार मांडले आहेत. काय म्हणाली अभिनेत्री?

"लग्नाला एक्सपायरी डेट असावी, कारण..."; काजोलचं मोठं विधान, विवाहसंस्थेबद्दल मांडले स्पष्ट विचार
बॉलिवूड अभिनेत्री ट्विंकल खन्ना आणि काजोल यांचा नवीन टॉक शो 'टू मच' सध्या चर्चेत असतो. नुकत्याच झालेल्या एका एपिसोडमध्ये ट्विंकलने लग्न झाल्यावर एकमेकांची फसवणूक, यावर तिचं मत मांडलं होतं. आता ट्विंकलनंतर काजोलनेही लग्नाबद्दल तिचं मत मांडलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे. काय म्हणाली काजोल?
विवाहाला 'एक्सपायरी डेट' असावी- काजोल
'टू मच' शोच्या आगामी एपिसोडमध्ये अभिनेता विकी कौशल आणि क्रिती सेनन पाहुणे म्हणून आले असताना, 'लग्नाला एक्सपायरी डेट असावी का?' असा प्रश्न विचारण्यात आला. यावर ट्विंकल खन्नाने लगेच प्रतिक्रिया दिली, "नाही, लग्न म्हणजे काय वॉशिंग मशीन नाही एक्स्पायरी डेट असायला" मात्र, काजोलने यावर स्पष्टपणे आपले मत व्यक्त केले.
ती म्हणाली, "माझा नक्कीच असा विचार आहे की, लग्नाला एक्सपायरी डेट असावी. कारण योग्य वेळी योग्य व्यक्तीशीच तुमचं लग्न होईल, याची खात्री काय? त्यामुळे, लग्नाला 'नूतनीकरणाचा पर्याय' (Renewal Option) असणं योग्य ठरेल. जर विवाहाला 'एक्सपायरी डेट'असेल, तर कोणालाही जास्त काळ त्रास सहन करावा लागणार नाही."
काजोलने ट्विंकलला तिच्या मताशी सहमत होण्यासाठी मनवण्याचा प्रयत्नही केला, परंतु क्रिती आणि विकी यांनी ट्विंकलच्या बाजूने सहमती दर्शवून काजोलला विरोध केला. काजोल आणि ट्विंकल खन्नाची ही बोल्ड आणि बिनधास्त विधानं सध्या चर्चेत आहे. 'टू मच' हा काजोल आणि ट्विंकलचा टॉक शो नेटकऱ्यांना चांगलाच आवडतोय. या शोमध्ये आतापर्यंत सैफ अली खान, अक्षय कुमार, सलमान, आमिर खान, आलिया भट, वरुण धवन, फराह खान, अनन्या पांडे या बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली आहे.