"तिला घेऊ नको, ती काळी आहे...", मराठी अभिनेत्रीला करावा लागलेला वर्णभेदाचा सामना
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 11:20 IST2025-08-26T11:18:35+5:302025-08-26T11:20:02+5:30
एका सीनिअर व्यक्तीने केलेली अशी कमेंट, अभिनेत्री म्हणाली...

"तिला घेऊ नको, ती काळी आहे...", मराठी अभिनेत्रीला करावा लागलेला वर्णभेदाचा सामना
आपल्याकडे कितीही नाही म्हटलं तरी वर्णभेद कायम आहे. मनोरंजनसृष्टीत तर ते प्रकर्षाने जाणवतं. मराठी असो वा हिंदी सिनेसृष्टीतही रंगरुप बघूनच काम दिलं जातं. सावळ्या रंगाचे असतील तर अनेकदा रिजेक्टही केलं जातं. या उलट खूपच गोरा रंग आहे किंवा सुंदर आहे म्हणूनही नाकारलं जातं. मराठी तसंच हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री पल्लवी जोशीलाही (Pallavi Joshi) असाच अनुभव आला होता. तिने एक जुना किस्सा नुकताच एका मुलाखतीत सांगितला.
'नवभारत टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत पल्लवी जोशी म्हणाली,"खूप आधी हे घडलं होतं. विवेकनेच मला एका टीव्ही प्रोजेक्टसाठी कास्ट केलं होतं. तेव्हा एक सीनियर व्यक्ती त्याला म्हणाला की पल्लवीला घेऊ नको. ती काळी आहे. मग विवेक त्यांना हसतच म्हणाला, 'मेकअप सुद्धा एक गोष्ट असते'. पण हे सुरुच आहे. आमच्याकडे तर जेव्हा मूल जन्माला येतं तेव्हा गोरं आहे का काळं असंच आधी विचारलं जातं. आजही आपल्याला गोऱ्या रंगाचं अप्रुप आहेच. मुलगा आहे की मुलगी? हेही विचारलं जातं. आजही लोक रेसिस्ट आणि सेक्सिस्ट आहेत. जोवर या मानसिकतेत बदल होत नाही तोवर काहीच बदलणार नाही."
पल्लवी जोशीला सगळेच 'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स'ची सूत्रसंचालिका म्हणून ओळखतात. तिने बालवयापासूनच अभिनयाला सुरुवात केली होती. 'ग्रहण' या मराठी मालिकेतही ती दिसली होती. अनेक हिंदी सिनेमांमध्ये तिने भूमिका साकारली. पल्लवीला तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कारानेही सम्मानित करण्यात आले. आता ती पती विवेक अग्निहोत्रींच्या 'द बंगाल फाईल्स'मध्ये दिसणार आहे. याआधी ती 'द काश्मीर फाईल्स'मध्येही दिसली होती.