ज़िन्दगी की ना टूटे लड़ी...प्यार कर ले घड़ी दो घड़ी... लम्बी लम्बी उमरिया को...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 09:34 IST2025-04-05T09:12:10+5:302025-04-05T09:34:05+5:30
Manoj Kumar: मनोज कुमार यांचे चित्रपट विविध विषयांवर आधारलेले असायचे. त्यात वेगवेगळ्या व्यक्तिरेखा असायच्या. उदाहरण द्यायचे तर ‘उपकार’मध्ये त्यांनी प्राणसाहेबांना दिलेला रोल खूपच हटके होता. त्यात ते खलनायक नव्हते. त्यापूर्वी सर्वच चित्रपटांमध्ये ते खलनायक करायचे. शेवटच्या काळात त्यांनी लेखनासह सर्वच कामे बंद केली होती.

ज़िन्दगी की ना टूटे लड़ी...प्यार कर ले घड़ी दो घड़ी... लम्बी लम्बी उमरिया को...
- आशा पारेख
मनोज कुमार यांच्या रूपात एक दिग्गज दिग्दर्शक गेल्याने सिनेसृष्टीचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे. मनोज कुमार सिनेसृष्टीत आले, तेव्हा त्यांनी सर्वप्रथम माझ्यासोबत काम केले होते. ‘अपना बना के देखो’ या चित्रपटात त्यांनी मुख्य भूमिका साकारली होती. त्या चित्रपटात जवळपास सर्वजण नवीन होते आणि जेव्हा मी त्यांच्यासोबत काम करायला होकार दिला, तेव्हा ते खूप भारावून गेले होते. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘उपकार’ या पहिल्या चित्रपटाची मी नायिका होते. ‘दो बदन’साठी त्यांनी बरेच सीन्स लिहिले होते. त्यांचे लेखन खूप सुरेख आणि अर्थपूर्ण होते. ते उत्तम दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते होते.
मनोज कुमार यांचे चित्रपट विविध विषयांवर आधारलेले असायचे. त्यात वेगवेगळ्या व्यक्तिरेखा असायच्या. उदाहरण द्यायचे तर ‘उपकार’मध्ये त्यांनी प्राणसाहेबांना दिलेला रोल खूपच हटके होता. त्यात ते खलनायक नव्हते. त्यापूर्वी सर्वच चित्रपटांमध्ये ते खलनायक करायचे. शेवटच्या काळात त्यांनी लेखनासह सर्वच कामे बंद केली होती.
मनोज कुमार एक चांगले होमिओपॅथी डॉक्टर होते. सिनेसृष्टीतील बरेच जण त्यांच्याकडे औषधोपचारांसाठी जायचे. मध्यंतरी जेव्हा माझ्याशी त्यांचे बोलणे झाले होते, तेव्हा मी त्यांना म्हणाले होते की, तुम्ही होमिओपॅथीवर एक पुस्तक का लिहीत नाही... पुस्तकामुळे तुमच्या औषधांचा इतरांना फायदा होईल. ते होकार द्यायचे, पण त्यांनी याबाबत काही लेखन केले की नाही हे माहीत नाही. त्यांनी चित्रपटांद्वारे मातृभूमीबाबत मनामनांत भक्तीची ज्योत जागविण्याचे काम केले. त्यामुळेच ते ‘मि. भारत’ म्हणून ओळखले गेले. ‘रोटी, कपडा और मकान’मध्ये त्यांनी जीवनाशी निगडित असलेला महत्त्वाचा विषय मांडला. ‘पूरब और पश्चिम’ या चित्रपटात ‘ईस्ट इज बेस्ट’ हा संदेश दिला.