"मी भारत सोडून जात आहे" बॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा निर्णय; देश सोडण्याचं सांगितलं कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 13:41 IST2026-03-06T13:36:56+5:302026-03-06T13:41:56+5:30
बॉलिवूड अभिनेत्री वादाच्या भोवऱ्यात, भारत सोडून जाण्याचा घेतला निर्णय

"मी भारत सोडून जात आहे" बॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा निर्णय; देश सोडण्याचं सांगितलं कारण
Mandana Karimi Leaving India : अभिनेत्री मंदाना करीमी सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर आनंद व्यक्त केल्यामुळे ती आधीच चर्चेत होती. त्यातच तिने भारत सोडून जाण्याचं वक्तव्य केल्याने तिच्यावर टीकेची झोड उठली. मात्र, आता तिने एक नवा व्हिडीओ शेअर करत आपल्या विधानावर स्पष्टीकरण दिलं आहे. "मी भारत सोडणार आहे, पण इराणला परत जाऊ शकत नाही" असं म्हणत तिने त्यामागचं एक धक्कादायक कारणही उघड केलं आहे.
मंदानाने भारत सोडण्याचं कारण सांगताना इथल्या लोकांविषयी नाराजी व्यक्त केली. ती म्हणाली, "गेल्या काही महिन्यांपासून मला भारतात कोणताही पाठिंबा मिळाला नाही. जेव्हा खामेनी यांचे निधन झाले, तेव्हा भारतातील अनेक लोक त्यांच्यासाठी शोक व्यक्त करण्यासाठी रस्त्यावर उतरले".
मंदानाने तिच्या सुरक्षेबाबतही गंभीर भीती व्यक्त केली आहे. ती सध्या एका सुरक्षित आणि गुप्त ठिकाणी असून, तिच्या जवळच्या मित्रांनाही तिचे लोकेशन माहित नाही. ती म्हणाली, "मी गेल्या सहा वर्षांपासून चित्रपटात काम करणं सोडलं आहे. हा माझा स्वतःचा निर्णय होता. आता मी माध्यमांशी फक्त माझ्या देशातील (इराण) लोकांसाठी आणि त्यांच्या हक्कांसाठी बोलत आहे".
इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांच्या मृत्यूवर मंदानाने आपली प्रतिक्रिया दिली. मृत्यूवर शोक व्यक्त करणाऱ्यांवर तिने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं करत खामेनी यांच्या राजवटीला 'हुकूमशाही' म्हटलं . सरकारकडून अनेक निष्पाप लोकांची हत्या करण्यात आल्याचा दावाही तिने यावेळी केला. तसेच आपण कधीच इराणबद्दल आणि माझ्या लोकांबद्दल बोलण्यापासून मागे हटणार नाही, आज नाही, उद्या नाही, कधीच नाही. असं तिनं म्हटलं. मुळची इराणी असलेली अभिनेत्री मंदाना करीमी गेली काही वर्ष भारतात वास्तव्यास होती. तिने १८ व्या वर्षीच इराण सोडले होते, तरीही ती सातत्याने तिथल्या लोकांच्या हक्कांसाठी आवाज उठवत आहे.