किन्नर नाही मग त्या आखाड्याची महामंडलेश्वर कशी बनली? अखेर ममता कुलकर्णीने मौन सोडलं, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 16:27 IST2025-02-04T16:24:16+5:302025-02-04T16:27:17+5:30
संन्यास घेतल्यानंतर ममता कुलकर्णीने आप की अदालतमध्ये हजेरी लावली. या मुलाखतीत तिने याबाबत भाष्य करत स्पष्टीकरण दिलं .

किन्नर नाही मग त्या आखाड्याची महामंडलेश्वर कशी बनली? अखेर ममता कुलकर्णीने मौन सोडलं, म्हणाली...
अभिनय आणि सौंदर्याने ९०चं दशक गाजवणाऱ्या अभिनेत्री ममता कुलकर्णीने संन्यास घेतला आहे. काही दिवसांपूर्वी प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यात शाही स्नान करत अभिनेत्रीने ही घोषणा केली. त्यानंतर तिला किन्नर आखाड्याचं महामंडलेश्वरही बनवण्यात आलं. पण, यावरुन मोठा वाद निर्माण झाल्याने ममता कुलकर्णीला अवघ्या सातच दिवसात या पदावरुन काढून टाकण्यात आलं होतं. किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर झाल्यामुळे तिच्यावर टीकाही करण्यात आली. आता अभिनेत्रीने यावर पहिल्यांदाच भाष्य केलं आहे.
संन्यास घेतल्यानंतर ममता कुलकर्णीने आप की अदालतमध्ये हजेरी लावली. या मुलाखतीत तिने याबाबत भाष्य करत स्पष्टीकरण दिलं .ममता म्हणाली, "महामंडलेश्वर बनायची माझी इच्छाच नव्हती. मला कुठलंही पद नको होतं. मी २३ वर्ष तपश्चर्या केली आहे. आखाड्याचे महामंडलेश्वर आचार्य लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनीच माझे स्वागत केले".
या मुलाखतीत ममता कुलकर्णीने बाबा रामदेव आणि धीरेंद्र शास्त्री यांनी केलेल्या आरोपांनाही उत्तर दिलं."ते भोळे धीरेंद्र शास्त्री... त्यांचं वय २५ वर्ष आहे तितकी तर माझी तपस्या आहे. त्यांना हनुमानजींची सिद्धी प्राप्त आहे. मला माझ्या २३ वर्षांच्या तपस्येत दोन वेळा हनुमानजींचं प्रत्यक्ष दर्शन घडलं आहे. धीरेंद्र शास्त्रींचे गुरु रामभद्राचार्य आहेत. मी धीरेंद्र शास्त्रींना सांगू इच्छिते की त्यांच्या गुरुंकडे दिव्य दृष्टी आहे. आपल्या गुरुंना विचारा की मी कोण आहे आणि गप्प बसा."
महामंडलेश्वर बनण्यासाठी १० कोटी दिल्याचा आरोप आणि टॉपलेस फोटोशूटच्या वादावर ममता कुलकर्णी म्हणाली, " दूधाचं तूप होतं झाल्यावर परत त्याला दूध बनवू शकत नाही. तसंच मी आता सिनेमांमध्ये पुन्हा येऊ शकत नाही. मी कधीच येणार नाही. जे लोक २-३ वर्षांनंतर सिनेसृष्टीत परत आलेत त्यांना ब्रह्मविद्याचं ज्ञान नाही. ज्यांना ज्ञान आहे ते असं करणार नाहीत."