भारतात परतल्यानंतर ममता कुलकर्णीने केले अनेक खुलासे; म्हणाली, "माझं लग्न झालेलं नाही..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 13:57 IST2024-12-06T13:56:38+5:302024-12-06T13:57:22+5:30
२४ वर्षांनी ममता पुन्हा भारतात आली आहे. इतक्या वर्षांनी येण्याचं कारणही तिने सांगितलं.

भारतात परतल्यानंतर ममता कुलकर्णीने केले अनेक खुलासे; म्हणाली, "माझं लग्न झालेलं नाही..."
अभिनेत्री ममता कुलकर्णी (Mamata Kulkarni) २४ वर्षांनी भारतात परतली आहे. भारतात येताच तिने व्हिडिओ शेअर केला. यामध्ये ती भावुक झालेली दिसली. करिअरच्या शिखरावर असतानाच २००० साली ममता देश सोडून गेली होती. २००० कोटींच्या ड्रग्स तस्करी प्रकरणात ती अडकली होती. केन्यातील आंतरराष्ट्रीय ड्रग ग्रुपसोबत तिचं कनेक्शन असल्याचा तिच्यावर आरोप होता. या मीटिंगमध्ये तिच्यासोबत विकी गोस्वामी आणि इतर आरोपीही होते. आता इतक्या वर्षांनंतर भारतात आल्यानंतर ममताने अनेक खुलासे केले आहेत.
'न्यूज १८ हिंदी'ला दिलेल्या मुलाखतीत ममता कुलकर्णी म्हणाली, "मी २४ वर्षा भारताबाहेर होते. स्वत:चाच शोध घेत होते. आता कुंभ मेळावा होणार आहे . तिथे सहभागी होण्यासाठी मी आले आहे. बिग बॉस साठी आलेले नाही या खोट्या चर्चा आहेत. देश सोडून जाण्याच्या आधी मी इंडस्ट्रीत आघाडीची अभिनेत्री होते. माझ्याजवळ ४३ सिनेमांच्या ऑफर्स होत्या. मी हे सगळं सोडलं. मला आता पुन्हा इंडस्ट्रीत यायचं नाही."
विकी गोस्वामीबद्दल ममता म्हणाली, "मी विकीला ओळखत होते. २०१४ मध्ये पोलिसांनी ज्या प्रकरणाचा उल्लेख केला तेव्हा मी केन्याला विकीला भेटायला गेले. पण मला माहित नव्हतं की तिथे त्याने कोणासोबत मीटिंग केली होती. पोलिसांनी माझंही नाव या प्रकरणात टाकलं पण माझा त्याच्या बिझनेसशी काहीच संबंध नव्हता. आज कोर्टाने मला सर्व आरोपांमधून मुक्त केले आहे."
ती पुढे म्हणाली,"विकी मनाने खूप चांगला आहे. फिल्म इंडस्ट्रीतील अनेक जण त्याला भेटायचे तसंच मीही भेटले. पण त्याला भेटणारी मी इंडस्ट्रीतील शेवटची व्यक्ती आहे. मला जेव्हा त्याच्या बिझनेसबद्दल कळलं तेव्हा मी त्याला सोडून दिलं. तो दुबईच्या जेलमध्ये होता तेव्हा त्याला बाहेर काढण्यासाठी मी ध्यान साधना केली. २०१२ मध्ये तो तुरुंगातून सुटला. २०१६ मध्ये मी त्याला भेटले. त्यानंतर त्याला पुन्हा अटक झाली. माझं त्याच्याशी लग्न झालेलं नाही. तो माझा नवरा नाही. मी आजही अविवाहित आहे. विकीसोबत मी रिलेशनशिपमध्ये होते पण ४ वर्षांपूर्वीच मी त्याला ब्लॉक केलं. आता तो माझा भूतकाळ आहे."