हिरे व्यापाऱ्याच्या प्रेमात पडली ५२ वर्षीय मलायका अरोरा, दोघांमध्ये आहे 'इतक्या' वर्षांचं अंतर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 12:30 IST2025-11-28T12:30:39+5:302025-11-28T12:30:56+5:30
मलायका पुन्हा प्रेमात पडली असल्याची चर्चा रंगलीय.

हिरे व्यापाऱ्याच्या प्रेमात पडली ५२ वर्षीय मलायका अरोरा, दोघांमध्ये आहे 'इतक्या' वर्षांचं अंतर
Malaika Arora Rumoured Boyfriend Harsh Mehta : बॉलिवूड अभिनेत्री आणि फॅशन आयकॉन मलायका अरोरा तिच्या ग्लॅमरस लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. मलायकाच्या वैयक्तिक आयुष्यात काय सुरू आहे, हे जाणून घेण्याची तिच्या चाहत्यांमध्ये कायम उत्सुकता असते. मलायका आणि अर्जुन कपूरसोबतचं रिलेशनशीप चांगलंच गाजलं होतं. अर्जुन आणि मलायका यांचे एकमेकांना डेट करतानाचे फोटोही चांगलेच व्हायरल झाले होते. दोघे लग्न करणार अशा चर्चा सरू होत्या. पण, दोघांच्या ब्रेकअपने सर्वांनाच धक्का बसला. अर्जुनसोबत ब्रेकअप झाल्यानंतर मलायका पुन्हा प्रेमात पडली असल्याची चर्चा रंगलीय.
अलिकडेच मलायका ही हर्ष मेहता नावाच्या एका व्यक्तीसोबत स्पॉट झाली. दोघांना एकत्र पाहिल्यानंतर त्यांच्या डेटिंगच्या अफवांना उधाण आले आहे. हर्ष मेहताबद्दल समोर आलेल्या माहितीनुसार, तो एका श्रीमंत कुटुंबातून आला असून त्याचा बॉलिवूडशी थेट संबंध नाही. हर्ष मेहताचे वय सध्या ३३ वर्षे आहे आणि तो मुंबईचा रहिवासी आहे. सूत्रांनुसार, तो हिऱ्यांचा व्यापारी असून त्याच्याकडे कोट्यवधींची मालमत्ता आहे. महत्त्वाचे म्हणजे, हर्ष मलायका अरोरापेक्षा तब्बल १७ वर्षांनी लहान आहे.
दोन ठिकाणी एकत्र दिसले
बुधवारी २६ नोव्हेंबर रोजी या दोघांना मुंबई एअरपोर्टवर पाहिलं गेलं. हे दोघं एकाच टर्मिनलमधून बाहेर पडले, तेव्हा पापाराझींनी त्यांचे फोटो आणि व्हिडीओ क्लिक केले. यावेळी हर्षच्या चेहऱ्यावर मास्क होता. मलायका आणि हर्षने एकमेकांसोबत चालणं टाळलं होतं. त्यामुळे मलायका पुढे निघून आली आणि हर्ष तिच्या मागून चालत होता. विशेष म्हणजे पार्किंगच्या ठिकामी पोहोचल्यानंतर आधी मलायका एका कारमध्ये बसली आणि काही क्षणांनंतर हर्षसुद्धा त्याच कारमध्ये बसल्याचं पहायला मिळालं. तर त्याआधी २९ ऑक्टोबर रोजी झालेल्या एका कॉन्सर्टमध्ये हर्ष मलायकासोबत लाईव्ह परफॉर्मन्सचा आनंद घेत असतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
गेल्या वर्षी अर्जुन कपूरसोबत ब्रेकअप
मलायकाने १९९८ मध्ये अभिनेता अरबाज खानशी लग्न केले होते आणि त्यांना अरहान खान हा मुलगा आहे. २०१७ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. अरबाजपासून वेगळे झाल्यानंतर मलायकाने २०१८ मध्ये अभिनेता अर्जुन कपूरला डेट करायला सुरुवात केली. मात्र, २०२४ मध्ये ते वेगळे झाले. अर्जुन कपूरसोबतचं नाते संपल्यानंतर लगेचच तिचे नाव हर्ष मेहताशी जोडले जात आहे. या दोघांपैकी कोणीही अद्याप त्यांच्या नात्याबद्दल कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.