महिमा चौधरीला २८ वर्षांच्या करिअरमध्येही इंडस्ट्रीत मिळालं नाही स्थान, म्हणाली, "अनेकदा..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2025 16:47 IST2025-12-14T15:15:24+5:302025-12-14T16:47:54+5:30
अभिनेत्यांसाठी हे सोपं असतं कारण...महिमा चौधरीने सांगितलं इंडस्ट्रीतलं कटु सत्य

महिमा चौधरीला २८ वर्षांच्या करिअरमध्येही इंडस्ट्रीत मिळालं नाही स्थान, म्हणाली, "अनेकदा..."
अभिनेत्री महिमा चौधरीला सगळेच 'परदेस' सिनेमामुळे ओळखतात. तिच्या करिअरमध्ये या एकमेव हिट सिनेमाचं नाव घेतलं जातं. महिमा लवकरच 'दुर्लभ प्रसाद की दुसरी शादी' या आगामी सिनेमात दिसणार आहे. महिमाला २८ वर्षांच्या करिअरमध्ये आजही स्वत:चं स्थान मिळालेलं नाही. नुकतंच तिने एका मुलाखतीत याबद्दल भावना मांडल्या.
'जागरण'ला दिलेल्या मुलाखतीत आगामी सिनेमाबद्दल महिमा चौधरी म्हणाली, "दिग्दर्शक सिद्धांतने मला मेसेज केला होता. त्यांना मी जुग जुग जिओ सिनेमासाठी असिस्ट केलं होतं. ते म्हणाले की मी एक सिनेमा बनवतोय. मला सिनेमाचं शीर्षक आवडलं होतं. बनारसमधल्या एका छोट्या कुटुंबाची ही गोष्ट आहे. इतर वेळी मी एक दोन दिवस विचार केल्यानंतर उत्तर देते. पण मी त्यांना लगेच बोलवलं. मला गोष्ट आवडली होती. आता इंडस्ट्रीत आधीसारखं काही राहिलेलं नाही जेव्हा एकाच प्रकारचं कास्टिंग व्हायचं. आमच्याकडून फक्त सुंदर दिसण्याची अपेक्षा केली जायची. आता तुम्हाला इंडस्ट्रीत नाविन्य दिसत आहे कारण प्रेक्षकांनाच तुम्हाला तसं पाहायचं आहे. अभिनेते आता खलनायकही बनत आहेत. आजकाल प्रत्येक प्रकारचा सिनेमा चालत आहे. अॅक्शन फिल्मही चालते आणि डॉक्युमेंटरी फिल्मही नाव कमावते. मला नेहमीच निर्माती-दिग्दर्शिका व्हायचं होतं जेणेकरुन मी स्वत:साठीच चांगल्या भूमिका घेऊ शकेन."
ती पुढे म्हणाली, "मी पहिलाच सिनेमा परदेस मध्ये जी भूमिका केली ती माझी निवड होती. सुरुवातीलाच जेव्हा तुम्हाला एक दर्जेदार भूमिका मिळते तेव्हा नंतर अशाच प्रकारे कास्ट केलं जातं. मला लज्जा, ये तेरा घर ये मेरा घर, दाग, धडकन सारखे सिनेमेही मिळाले. माझ्यासाठी रस्ता आपोआप बनत गेला. अभिनेत्यांसाठी भूमिका निवडणं अनेकदा सोपं होऊन जातं कारण त्यांनी आपापले प्रोडक्शन हाऊस सुरु केले आहेत. ते स्वत:च आपल्या भूमिका, दिग्दर्शकही निवडतात. अभिनेत्रींना तसं स्वातंत्र्य मिळत नाही. मलाही अनेकदा निर्मितीत उतरावं वाटतं, दिग्दर्शन करावं वाटतं. पण आयुष्याच सतत असं काहीरी होतं की मी त्याकडे लक्षच देऊ शकत नाही."