'माझी लेक मला दूर ढकलत होती'; 'त्या' घटनेनंतर महेश भट्टने 36 वर्षांत केला नाही दारुला स्पर्श
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2023 10:09 IST2023-08-02T10:09:14+5:302023-08-02T10:09:56+5:30
Mahesh Bhatt: महेश भट्ट यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

'माझी लेक मला दूर ढकलत होती'; 'त्या' घटनेनंतर महेश भट्टने 36 वर्षांत केला नाही दारुला स्पर्श
दिग्दर्शक, निर्माता असलेले महेश भट्ट (Mahesh Bhatt) कोणासाठीही नवीन नाहीत. महेश भट्ट यांचं जितकं फिल्मी करिअर गाजलं त्यापेक्षा कैकपटीने त्यांची पर्सनल लाइफ चर्चिली गेली. किंबहुना अजूनही त्यांच्या वैयक्तिक जीवनाची नेटकऱ्यांमध्ये चर्चा होते. बऱ्याचदा वादग्रस्त वक्तव्य करुन चर्चेत येणारे महेश भट्ट सध्या त्यांच्या दारुच्या व्यसनामुळे चर्चेत येत आहेत. एकेकाळी ते दारुच्या प्रचंड आहारी गेले होते. अलिकडेच त्यांनी बिग बॉस ओटीटीमध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी त्यांच्या दारुच्या व्यसनाविषयी आणि त्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीविषयी भाष्य केलं.
बिग बॉस ओटीटीचं दुसरं पर्व यंदाच चांगलंच गाजताना दिसत आहे. हे पर्व अनेक कारणांसाठी गाजलं. त्यामध्येच आता या शोमध्ये दिग्दर्शक महेश भट्ट यांची एन्ट्री होणार आहे. या कार्यक्रमाचा एक प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये महेश भट्ट बिग बॉस ओटीटीच्या घरात पोहोचले असून त्यांनी त्यांच्या जीवनाविषयी काही खुलासे केले. ‘बिग बॉस लाईव्ह फीड १’ या ट्विटर अकाउंटवरून बिग बॉस ओटीटीच्या घरातील महेश भट्ट यांचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
#Livefeed#MaheshBhatt to #Elvish :- Dil roya mera jab tu royaa.. pic.twitter.com/cF8EpPGWGA
— BB LF Videos (@BBosslivefeed1) August 1, 2023
मद्यपानाविषयी काय म्हणाले महेश भट्ट?
“ मी एकदा दारु पिऊन रस्त्यावर पडलो होतो. यशस्वी होतो, त्यामुळे खूप दारु प्यायचो. एकदा कुठल्यातरी पार्टीवरुन घरी येत असताना मी जुहूच्या रस्त्यावर दारु पिऊन पडलो. सकाळी त्याच अवस्थेत उठलो तर माझ्या चेहऱ्या जवळ एक दगड पडला होता. त्यावेळी मला जाणीव झाली की मी भररस्त्यात पडलो आहे. मला आतून माझा आवाज सांगत होता की महेश भट्ट, तू एक मद्यपी आहेस. तू जरी लोकप्रिय दिग्दर्शक असलास तरी सुद्धा आज तू इतर लोकांप्रमाणे रस्त्यावर पडला आहे, असं महेश भट्ट म्हणाले.
पुढे ते म्हणतात, "मी त्याच अवस्थेत उठलो आणि घरी गेलो. घरी गेल्यावर माझ्या लेकीला पूजाची लहान बहीण शाहीन हिला जवळ घेतलं. पण, ती मला दूर लोटत होती असं मला वाटलं. म्हणजे तिला दारुच्या वासाने त्रास होतोय असं मला वाटत होतं. त्या दिवसापासून ३६ वर्ष झाली मी दारुला स्पर्श केला नाही. तो एक क्रांतीचा क्षण होता."