'तेजाब'साठी माधुरी दीक्षितला नव्हती पहिली पसंती, अभिनेत्रीच्या या वर्तणुकीमुळे वैतागलेले निर्माते
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 15:55 IST2025-08-28T15:55:04+5:302025-08-28T15:55:54+5:30
Tezaab Movie : अनिल कपूर अभिनित 'तेजाब' हा हिंदी चित्रपटसृष्टीतील एक कल्ट चित्रपट मानला जातो. या चित्रपटात माधुरी दीक्षितने महत्त्वाची भूमिका साकारली होती. पण तुम्हाला माहित आहे का, की तेजाबसाठी माधुरी दीक्षित ही निर्मात्यांची पहिली पसंती नव्हती. याचे कारण वाचून चकीत व्हाल.

'तेजाब'साठी माधुरी दीक्षितला नव्हती पहिली पसंती, अभिनेत्रीच्या या वर्तणुकीमुळे वैतागलेले निर्माते
१९८८ मध्ये 'तेजाब' (Tezaab Movie) हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. अनिल कपूर (Anil Kapoor), माधुरी दीक्षित (Madhuri Dixit), चंकी पांडे आणि किरण कुमार अशा अनेक कलाकारांनी सजलेल्या या चित्रपटाने आपल्या उत्तम कथानकाने प्रेक्षकांची मने जिंकली. तेजाब अनेक महिने थिएटरमध्ये चालला आणि बॉक्स ऑफिसवर त्याने भरपूर कमाई केली. चित्रपटातील माधुरी दीक्षितचे 'एक, दो, तीन...' हे आयटम साँगही खूप गाजले. पण तेजाबसाठी माधुरी ही निर्मात्यांची पहिली पसंती नव्हती? यामागचं कारण तुम्हाला चकित करेल.
खरंतर, 'तेजाब' चित्रपटाचे दिग्दर्शन एन. चंद्रा यांनी केले होते, तर निर्माते पहलाज निहलानी होते. पहलाज आणि माधुरी यांचे संबंध फारसे चांगले नव्हते, कारण त्यांना अभिनेत्रीचा उद्धटपणा आवडत नव्हता. नुकत्याच पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत निर्मात्यांनी याबद्दल मोकळेपणाने सांगितले, "जेव्हा जेव्हा मी माझ्या एखाद्या चित्रपटाचा प्रस्ताव घेऊन माधुरी दीक्षितकडे जायचो, तेव्हा ती नकार द्यायची. मी तिला गोविंदाच्या तीन चित्रपटांची ऑफर दिली होती आणि तिने कोणतेही कारण न देता ते नाकारले. माझे ते तिन्ही चित्रपट यशस्वी झाले आणि दुसरीकडे माधुरीच्या करिअरचा आलेख खाली येऊ लागला. नंतर आम्ही तेजाब चित्रपट बनवणार होतो."
अशाप्रकारे माधुरी बनली 'तेजाब'ची मोहिनी
ते पुढे म्हणाले की,"मुख्य अभिनेत्रीसाठी आम्ही आधी मीनाक्षी शेषाद्रीचे नाव निश्चित केले होते. पण तिच्या व्यग्र वेळापत्रकामुळे ती हा चित्रपट करू शकली नाही. मुख्य अभिनेत्रीचा शोध चालूच होता. मग आमच्या टीममधील एकाने सांगितले की, माधुरी या भूमिकेसाठी तयार आहे. मला आश्चर्य वाटले की ती का तयार झाली, कारण ती पुन्हा प्रस्ताव नाकारेल असे मला वाटले होते. पण या वेळी तिला माझ्या ऑफरची गरज होती. अशा प्रकारे ती तेजाबची मोहिनी बनली. या चित्रपटाला यश मिळाले आणि माधुरीचे अभिनय करिअर पुन्हा रुळावर आले."
'तेजाब' ठरला यशस्वी
'तेजाब' हा १९८८ च्या सर्वाधिक बॉक्स ऑफिस कलेक्शन करणाऱ्या चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाची कथा आणि गाणी अजूनही उल्लेखनीय आहेत. इतकेच नाही तर अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित यांच्या कारकिर्दीतील हा एक कल्ट चित्रपट मानला जातो.