"अमेरिकेतील माझे शेजारी पोलिसांनाच बोलवणार होते...", माधुरी दीक्षितने सांगितला भन्नाट किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 16:36 IST2025-12-04T16:35:32+5:302025-12-04T16:36:49+5:30
माधुरी दीक्षित कुटुंबासोबत काही वर्ष अमेरिकेत राहत होती.

"अमेरिकेतील माझे शेजारी पोलिसांनाच बोलवणार होते...", माधुरी दीक्षितने सांगितला भन्नाट किस्सा
बॉलिवूडची 'धकधक गर्ल' माधुरी दीक्षित आगामी 'मिसेस देशपांडे' सीरिजमध्ये दिसणार आहे. माधुरी काही वर्षांपूर्वी अमेरिकेहून परत आली आणि तिची करिअरमध्ये दुसरी इनिंग सुरु झाली. आजही माधुरीचं सौंदर्य, तिची गोड स्माईल आहे तशीच आहे. कुटुंबासोबत अमेरिकेत असताना तिच्या शेजारील लोकांना तिच्या प्रसिद्धीविषयी काहीच कल्पना नव्हती. माधुरीच्या घराबाहेर काही लोक गाडी हळू करुन बघत बसायचे. हे पाहून शेजारचे लोक चक्क पोलिसांना बोलवणार होते. हा मजेशीर किस्सा माधुरीने नुकतंच मुलाखतीत सांगितला.
'द क्विंट'शी बोलताना माधुरी दीक्षित म्हणाली, "लग्नानंतर मी अमेरिकेत राहत असताना काही मूळ भारतीय लोक माझ्या घराबाहेर यायचे. मला पाहण्यासाठी तिथे घुटमळायचे. माझ्या घरासमोरुन जातानाच गाडी हळू करायचे आणि चकरा मारायचे. मी अभिनेत्री आहे हे माझ्या शेजारील लोकांना माहित नव्हतं. एकदा माझ्या शेजारी राहणाऱ्या एका महिलेने मला फोन केला. ती म्हणाली, 'तुझ्या घराबाहेर काही लोक सारखे येत आहेत. तुझ्या घरावर नजर ठेवत आहेत. मी पोलिसांना बोलवू का?' तेव्हा मी म्हणाले, 'नको नको..ते मलाच बघायला येतात. मी भारतात अभिनेत्री आहे.' हे ऐकून त्यांना आश्चर्य वाटलं. मग त्यांनी मला गेट टू गेदरला बोलवलं. त्यांच्यातील एकाला संगीताची आवड होती. ते माझ्याकडून बऱ्याच सीडीही घेऊन गेले होते."
ती पुढे म्हणाली,"मी माझ्या मुलांना अगदी साध्या वातावरणात मोठं केलं. कुठेही त्यांना सेलिब्रिटी असल्याची जाणीव होऊ दिली नाही. आम्ही अमेरिकेत असताना हे शक्य झालं. भारतात आल्यानंतर त्यांना ती जाणीव झाली."
माधुरी दीक्षितची आगामी 'मिसेस देशपांडे' वेबसीरिज सस्पेन्स थ्रिलर आहे. सीरिजमध्ये सिद्धार्थ चांदेकरचीही भूमिका आहे. १९ डिसेंबर रोजी सीरिज हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.