अमेरिका सोडून भारतात परत का आली माधुरी दीक्षित? म्हणाली, "बऱ्याच गोष्टी घडल्या..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 15:26 IST2025-12-06T15:24:39+5:302025-12-06T15:26:17+5:30
आईवडिलांना घेऊन भारतात परत आलेली माधुरी

अमेरिका सोडून भारतात परत का आली माधुरी दीक्षित? म्हणाली, "बऱ्याच गोष्टी घडल्या..."
८०-९० च्या दशकातील आघाडीची अभिनेत्री माधुरी दीक्षित. 'धकधक गर्ल' अशीही तिची ओळख आहे. माधुरीच्या सौंदर्यावर, अभिनयावर आणि तिच्या डान्सवर चाहते फिदा आहेत. आज वयाच्या ५८ व्या वर्षीही तिचं सौंदर्य आहे तसंच आहे. हिंदी सिनेविश्वात तिने एकापेक्षा एख हिट सिनेमे दिले. तिची अनेक गाणी आजही पाहिली जातात. यशाच्या शिखरावर तिने लग्न केलं आणि ती थेट अमेरिकेत स्थायिक झाली. अनेक वर्षांनी तिने भारतात येण्याचा निर्णय घेतला. माधुरीने आता यामागचं कारण सांगितलं आहे.
माधुरी दीक्षितने १९९९ साली डॉ श्रीराम नेनेंशी लग्नगाठ बांधली. डॉ नेने आणि त्यांचं कुटुंब अमेरिकेत राहत होतं. माधुरीही लग्नानंतर अमेरिकेतच स्थायिक झाली. तिने दोन मुलांना जन्म दिला. तिची मुलंही तिथेच लहानाची मोठी झाली. जवळपास दशकभरानंतर माधुरी पुन्हा भारतात आली. तिने सिनेसृष्टीतही कमबॅक केलं. हा निर्णय का घेतला यावर रणवीर अलाहाबादियाला दिलेल्या मुलाखतीत माधुरी दीक्षित म्हणाली, "बऱ्याच गोष्टी घडल्या. माझे आईवडील माझ्यासोबतच राहत होते. माझे अनेक भावंडं अमेरिकेत राहत आहेत. रामचे कुटुंबीयही तिथेच आहेत. आईवडिलांना त्यांच्या उतारवयात पुन्हा भारतात जाण्याची इच्छा होती. माझ्या संपूर्ण करिअरमध्ये आणि आयुष्यात ते दोघंही माझ्यासोबतच होते. त्यामुळे मला त्यांना एकटं सोडायचं नव्हतं."
ती पुढे म्हणाली, "दुसरं म्हणजे माझंही काम भारतातच होतं. एरवी मी भारतात यायचे, काम करायचे आणि अमेरिकेत परत जायचे. पण भारत-अमेरिका मोठा प्रवास होता जे फार कठीण होतं. रामकडे येणारेही अनेक रुग्ण हे अगदीच वाईट परिस्थिती असायचे. त्यामुळे त्यांना रुग्णांच्या या अडचणी नंतर वाढण्याआधी सुरुवातीच्या स्टेजवरच थांबवायच्या होत्या. चांगली जीवनशैली, आहाराविषयी त्यांना जनजागृती करायची होती. मग आम्हाला वाटलं की हीच ती वेळ आहे कारण सगळ्याच बाजूने भारतात परतणं फायद्याचं वाटत होतं. मलाही भारताची खूप आठवण यायची. रामनाही बदल हवा होता म्हणून आम्ही कुटुंबासाठी भारतात परत येण्याचा निर्णय घेतला."