लोक मला टोमणे मारायचे..., माधुरी दीक्षितने देखील ‘त्या’ दिवसांत खूप काही सोसलं...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2022 14:12 IST2022-03-08T13:55:42+5:302022-03-08T14:12:18+5:30
Madhuri Dixit : सुभाष घई यांनी माधुरी दीक्षितला संधी दिली आणि बॉलिवूडला ‘धकधक गर्ल’ मिळाली. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. अर्थात यामागे मोठा संघर्ष होता.

लोक मला टोमणे मारायचे..., माधुरी दीक्षितने देखील ‘त्या’ दिवसांत खूप काही सोसलं...!
बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ अर्थात माधुरी दीक्षित (Madhuri Dixit ). या ‘मोहिनी’च्या हास्याने सर्वांनाच वेड लावलं. 16-17 वर्षांची असताना माधुरीला तिचा पहिला चित्रपट मिळाला. चित्रपटाचं नाव होतं ‘अबोध’. पहिला सिनेमा फ्लॉप झाला. यानंतर तिने आणखी चारदोन सिनेमे केलेत. ते सुद्धा आपटले. पण सुभाष घई यांनी तिला संधी दिली आणि बॉलिवूडला ‘धकधक गर्ल’ मिळाली. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. अर्थात यामागे मोठा संघर्ष होता. इतक्या वर्षात पहिल्यांदा माधुरी या स्ट्रगलबद्दल बोलली. करिअरच्या सुरुवातीला या ‘धकधक गर्ल’लाही लोकांचे टोमणे, टीका सहन करावी लागली.
आरजे सिद्धार्थ काननला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत माधुरीने त्या दिवसाच्या काही कटू आठवणी सांगितल्या. लोक तिच्या लूकची कशी खिल्ली उडवायचे, तिला कसे टोमणे मारायचे, हे तिने सांगितलं.
मी हिरोईनसारखी दिसत नाही...
मी हिरोईनसारखी दिसत नाही,असं तेव्हा मला लोक म्हणायचे. कारण त्यावेळी माझं वय खूप कमी होतं. शिवाय मी मराठी कुटुंबातून आलेली होती. दिसायला बरीच सडपातळ होती. त्यावेळी नायिका कशी असावी यावर लोकांची विचारधारा फार वेगळी होती. त्यामुळे काही गोष्टींचा सामना मला करावा लागला, असं माधुरीने सांगितलं.
माझी आई खूप खंबीर स्त्री होती. तुम्ही चांगलं काम केलं तर लोक तुम्हाला चांगल्या कामासाठी नक्की ओळखतील, असं ती नेहमी म्हणे. यशस्वी झाल्यानंतर लोक बाकी सर्व विसरतात, असं ती मला सांगायची. तिचं हे शब्द आजतागायत माझ्या आठवणीत आहेत, असंही ती म्हणाली.
आणि लोकांची भाषा बदलली...
याआधी ‘द अनुपम खेर’ या शोमध्येही माधुरीने करिअरच्या सुरूवातीला तिला सहन कराव्या लागलेल्या टीकेबद्दल बोलली होती. ‘माझे दोन सिनेमे फ्लॉप झाले होते आणि लोकांच्या निगेटीव्ह कमेंट्स मला ऐकू येत होत्या. अगदी मी हिरोईन मटेरियल नाही, मी खूप सडपातळ आहे, असे लोक म्हणत होते. मी ते ऐकून निराश झाले होते. पण तेजाब हिट झाला आणि सगळं काही बदललं. लोकांची भाषा बदलली. आधी मी त्यांना सडपातळ दिसायची, तेजाब हिट झाल्यावर तेच लोक मला स्लीम म्हणू लागले. अरे ही खूप चांगलं काम करते, जबरदस्त डान्स करते, अशा शब्दांत लोक माझं कौतुक करू लागले, असं ती म्हणाली होती.
माधुरी दीक्षितने 1984 मध्ये ‘अबोध’ चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर 1988 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तेजाब’ या चित्रपटाने माधुरीला खरी ओळख दिली. यानंतर माधुरीने साजन, दिल तेरा आशिक, बेटा, हम आपके है कौन, दिल तो पागल है, देवदास यासारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले.