DDLJ ला ३० वर्ष पूर्ण! राज-सिमरनच्या ब्राँझ पुतळ्याचं लंडनमध्ये अनावरण; शाहरुख-काजोलच्या आनंदाला उधाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 10:58 IST2025-12-05T10:57:10+5:302025-12-05T10:58:31+5:30
शाहरुख-काजोलची भूमिका असलेल्या DDLJ सिनेमाला ३० वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त लंडनमध्ये राज-सिमरनची पोझ असलेल्या खास पुतळ्याचं उद्धाटन करण्यात आलं आहे

DDLJ ला ३० वर्ष पूर्ण! राज-सिमरनच्या ब्राँझ पुतळ्याचं लंडनमध्ये अनावरण; शाहरुख-काजोलच्या आनंदाला उधाण
यशराज फिल्म्सचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'ला प्रदर्शित होऊन नुकतीच ३० वर्षे पूर्ण झाली आहेत. या ऐतिहासिक क्षणाचे औचित्य साधून अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री काजोल यांनीलंडनमध्ये 'राज' आणि 'सिमरन' यांच्या ब्रॉन्झ पुतळ्याचे अनावरण केले. सर्वांसाठी हा खास क्षण होता.
लंडनच्या लीसेस्टर स्क्वेअरमध्ये पुतळा
'DDLJ' मध्ये शाहरुख खान आणि काजोल यांनी साकारलेली 'राज' आणि 'सिमरन' ही पात्रे आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. याच लोकप्रिय जोडीच्या चित्रपटातील एका आयकॉनिक पोजवर आधारित हा पुतळा लंडनच्या लीसेस्टर स्क्वेअर येथे उभारण्यात आला आहे. 'Scenes in the Square Trail' मध्ये पुतळ्याच्या माध्यमातून सन्मानित होणारा 'DDLJ' हा पहिला भारतीय चित्रपट ठरला आहे, ही निश्चितच अभिमानाची गोष्ट आहे.
शाहरुख-काजोलचा आनंद
या पुतळ्याचे अनावरण करताना शाहरुख खान आणि काजोल खूप आनंदी दिसत होते. दोघांनीही पुतळ्यासमोर 'राज-सिमरन'च्या अंदाजात पोज देत ३० वर्षांच्या DDLJ प्रवासाचा आनंद साजरा केला.
यावेळी, शाहरुख खानने सोशल मीडियावर काजोलसोबत एक पोस्ट शेअर करत आपले मनोगत व्यक्त केले. शाहरुखने लिहिलं की, "बडे बडे देशों में, ऐसी छोटी-छोटी बातें होती रहती हैं, सेनोरीटा! आज लंडनच्या लीसेस्टर स्क्वेअरवर राज आणि सिमरनच्या ब्रॉन्झ पुतळ्याचे अनावरण करताना खूप आनंद होत आहे. 'DDLJ' ला ३० वर्षे पूर्ण झाल्याचा हा सोहळा आहे. यूकेमधील सर्व लोकांचे खूप-खूप आभार."
आदित्य चोप्रा दिग्दर्शित 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' हा चित्रपट १९९५ साली प्रदर्शित झाला होता. भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक काळ चाललेल्या चित्रपटांच्या यादीत याचा समावेश आहे. आजही मुंबईतील मराठा मंदिर थिएटरमध्ये DDLJ चा दररोज सकाळी एक शो असतो.