LMOTY 2024: "यश डोक्यावर घेऊ नकोस", मुकेश अंबानींचा सल्ला मानतो रणबीर कपूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2024 14:32 IST2024-02-16T14:32:12+5:302024-02-16T14:32:34+5:30
Lokmat Maharashtrian of the Year Awards 2024: रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यंदाचा 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर'मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्काराचा मानकरी ठरला आहे.

LMOTY 2024: "यश डोक्यावर घेऊ नकोस", मुकेश अंबानींचा सल्ला मानतो रणबीर कपूर
Lokmat Maharashtrian of the Year Awards 2024: महाराष्ट्राच्या विकासासाठी भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान सोहळा दरवर्षी 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' या सोहळ्यात केला जातो. लोकसेवा-समाजसेवा, कृषी, शिक्षण, प्रशासन, वैद्यकीय, उद्योग, राजकारण या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना दरवर्षी पुरस्काराने गौरविण्यात येतं. यंदा मनोरंजन क्षेत्रातील योगदानाबद्दल बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरला पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रेक्षकांमध्ये त्याची क्रेझ पाहता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यंदाचा 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर'मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्काराचा मानकरी ठरला आहे. ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र कपूर यांच्या हस्ते रणबीरला सम्मानित करण्यात आले.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' ठरल्यानंतर रणबीरने मान्यवरांचे आभार मानले. यावेळी मनोगत व्यक्त करताना रणबीरने प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या सल्ल्याबद्दलही भाष्य केलं. मुकेश अंबानींचा सल्ला मानत असल्याचं रणबीरने सांगतिलं. तो म्हणाला, "माझे आयुष्यात तीन लक्ष्य आहेत. पहिलं म्हणजे चांगलं काम करा. मी मुकेश अंबानी यांच्याकडून प्रेरणा घेतली आहे. ते म्हणतात की यश डोक्यात जाऊन देऊ नका आणि अपयश मनाला लावून घेऊ नका."
"दुसरं म्हणजे चांगला माणूस व्हा. मला चांगला मुलगा, चांगले वडील, चांगला नवरा, भाऊ आणि मित्र व्हायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या देशाचा चांगला नागरिक व्हायचं आहे. मुंबईकर असल्याचा मला गर्व आहे. आणि हा पुरस्कार माझ्यासाठी खूप काही आहे," असंही पुढे रणबीर म्हणाला. रणबीर कपूर 'ब्रह्मास्त्र 2', 'अॅनिमल पार्क', 'लव्ह अँड वॉर' या सिनेमात दिसणार आहे. तर नितेश तिवारींच्या आगामी 'रामायण' सिनेमात तो प्रभू श्रीरामाची भूमिका साकारणार असल्यामुळे तो चर्चेत आहे.