परेश रावलनंतर 'या' अभिनेत्रीनेही दिली स्वतःचं युरिन प्यायल्याची कबुली, म्हणाली- "चेहऱ्यासाठी चांगलं असतं अन्..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 10:23 IST2025-05-02T10:22:10+5:302025-05-02T10:23:34+5:30
परेश रावल यांनी काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत स्वतःचं युरिन पिऊन दुखापत बरी केल्याचा खुलासा केला होता. अशातच एका बॉलिवूड अभिनेत्रीने परेश रावल यांच्या म्हणण्याला समर्थन दिलं असून तिने युरिन पिण्याचे फायदे सांगितले आहेत

परेश रावलनंतर 'या' अभिनेत्रीनेही दिली स्वतःचं युरिन प्यायल्याची कबुली, म्हणाली- "चेहऱ्यासाठी चांगलं असतं अन्..."
काहीच दिवसांपूर्वी एका मुलाखतीत परेश रावल (paresh rawal) यांनी दुखापतीमधून बरं होण्यासाठी स्वतःची लघवी प्यायल्याचा खुलासा केला होता. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटलं. परेश रावल यांच्या विधानावर सध्या प्रतिक्रिया येत असतानाच बॉलिवूडमधील एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीने स्वतःची लघवी प्यायल्याचा खुलासा नुकताच एका मुलाखतीतल केला. याशिवाय युरिनचे फायदेही सांगितले. ही अभिनेत्री आहे 'आशिकी' सिनेमा गाजवणारी अनु अग्रवाल. काय म्हणाली अनु अग्रवाल (anu aggarwal) जाणून घ्या
अनु अग्रवाल युरिन पिण्याविषयी काय म्हणाली?
इंस्टंट बॉलिवूडला दिलेल्या मुलाखतीत अनु अग्रवालने हा खास खुलासा केला. ती म्हणाली की, "अनेक लोकांना हे माहित नाही. लोकांमध्ये ज्ञानाची किंवा जागरुकतेची कमी आहे पण लघवी पिण्याला आम्रोली मुद्रा म्हणतात. योगमध्ये ही एक मुद्रा आहे. मी स्वतः याचा अभ्यास केला आहे. आम्ही याचा प्रयोग केला असून सर्वांना याविषयी अभ्यास करण्याची गरज आहे. हेही लक्षात घेतलं पाहिजे की तुम्ही युरिन एका दमात पिऊ शकत नाही. युरिनचा फक्त मधला भाग घेतला जातो ज्याला अमृत मानलं जातं."
"याचा उपयोग एँटी - एजिंगच्या (वय लपवणे) दृष्टीकोनातून केला जातो. यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या येत नाहीत आणि एकूणच आरोग्याच्या दृष्टीनेच नव्हे, तर संपूर्ण जीवनकल्याणासाठी हे आश्चर्यकारक मानलं जातं. मी स्वतः या उपायाचे फायदे अनुभवले आहेत. मी योगाचा संपूर्ण पाठिंबा करते आणि मी योग जगते." अशाप्रकारे अनु अग्रवाल यांनी याविषयी खुलासा केला. एकूणच युरिन प्राशन करण्याचे फायदे त्यांनी सर्वांना सांगितले.
परेश रावल काय म्हणाले होते
परेश रावल 'घातक' या सिनेमाचं शूटिंग करत होते. या सिनेमाचं शूटिंग करताना परेश यांच्या गुडघ्याला दुखापत झाली. या दुखापतीनंतर टीनू आनंद आणि डॅनी डेन्जोंगपा परेश यांना नानावटी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. या जबर दुखापतीमुळे माझं करिअर संपलं, अशी परेश रावल यांना भीती वाटली. त्याचवेळी अजय देवगणचे वडील आणि दिवंगत अॅक्शन डायरेक्टर वीरु देवगण यांनी परेश रावल यांना स्वतःची लघवी पिण्याचा सल्ला दिला. त्यामुळे काही दिवसांनी परेश रावल दुखण्यातून ठणठणीत बरे झालेले दिसले