पाकिस्तानात राहिली, लष्कर अधिकाऱ्याशी लग्न केलं अन्...; भारतीय गुप्तहेराची थरारक कहाणी, ओटीटीवर पाहा 'हा' सिनेमा
By कोमल खांबे | Updated: December 24, 2025 12:00 IST2025-12-24T11:56:20+5:302025-12-24T12:00:52+5:30
'धुरंधर'प्रमाणे याआधीही भारतीय गुप्तहेरांच्या कामगिरीवर अनेक सिनेमे येऊन गेले आहेत. या सिनेमातून पाकिस्तानी लष्कर अधिकाऱ्याशी लग्न केलेल्या आणि पाकिस्तानात जाऊन राहिलेल्या भारतीय गुप्तहेर सेहमत खानची कहाणी दाखवण्यात आली आहे.

पाकिस्तानात राहिली, लष्कर अधिकाऱ्याशी लग्न केलं अन्...; भारतीय गुप्तहेराची थरारक कहाणी, ओटीटीवर पाहा 'हा' सिनेमा
'धुरंधर' या सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. या सिनेमात पाकिस्तानात जाऊन राहिलेल्या भारतीय गुप्तहेर असलेल्या हमझा अली मदारीची कहानी दाखवण्यात आली आहे. या सिनेमात अनेक सत्य घटनांचा उल्लेखही केला गेला आहे. 'धुरंधर'प्रमाणे याआधीही भारतीय गुप्तहेरांच्या कामगिरीवर अनेक सिनेमे येऊन गेले आहेत. यापैकीच एक म्हणजे 'राझी'. २०१८ साली प्रदर्शित झालेल्या या सिनेमानेही प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं.
'राझी' सिनेमाची कथा
१९७१च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर सत्यघटनेवर आधारित कथा 'राझी' सिनेमातून दाखवण्यात आली आहे. सेहमत खान नावाची काश्मिरी तरुणी वडिलांच्या सांगण्यावरुन पाकिस्तानात जाऊन भारतीय गुप्तहेर म्हणून काम करते. सेहमत खानचे वडील हकीम खान हे भारतासाठी अनेक वर्ष विश्वासू गुप्तहेर म्हणून काम करतात. पाकिस्तानी लष्करात असलेल्या उच्च अधिकाऱ्याशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध असतात. देशासाठी गुप्तहेर म्हणून काम करताना अचानक त्यांची तब्येत बिघडते आणि आपलं अर्धवट राहिलेलं काम पूर्ण करण्यासाठी ते आपल्या मुलीची नेमणूक करतात.
पाकिस्तानी लष्करात असलेल्या मित्राच्या मुलाशी इक्बाल सय्यदशी हकीम खान त्यांची मुलगी सेहमत खानचं लग्न लावून देतात. सय्यददेखील पाकिस्तानी लष्करातील एक निष्ठावान सैनिक असतो. सय्यदशी लग्न झाल्यानंतर सेहमत पाकिस्तानात जाऊन गुप्तपणे तिचं काम सुरू ठेवते. अत्यंत हुशारीने ती लष्करी बैठकांची माहिती, कागदपत्रे अशी महत्त्वाची माहिती भारताला पुरवत असते. यामुळे भारताला युद्धासंबंधी काह माहितीही मिळते. पण, सेहमत भारतीय गुप्तहेर असल्याचा सुगावा तिच्या दीराला लागतो. त्यामुळे सेहमतला कठोर निर्णय घ्यावा लागतो.

शेवटी सेहमतच्या नवरा सय्यदलाही तिच्याबद्दल कळतं. युद्ध संपल्यानंतर सेहमत प्राण वाचवत भारतात परतते. पण, यादरम्यान तिचं पतीसोबतचं नातं खूप पुढे गेलेलं असतं. भारतात जेव्हा ती परतते तेव्हा सेहमत गरोदर असते. 'राझी' सिनेमा हा देशभक्तीवर आधारित आहे. या सिनेमाची कथा तुम्हाला खिळवून ठेवते तर क्लायमॅक्स तुमच्या काळजाचा ठोका चुकवतो.
'राझी'मधील कलाकार
'राझी' सिनेमात आलिया भटने मुख्य भूमिका साकारली आहे. या सिनेमासाठी तिचं कौतुकही झालं होतं. तर विकी कौशल इक्बाल सय्यदच्या भूमिकेत आहे. सिनेमात अमृता खानविलकर, सोनी राजदान, जयदीप अहलावत, रजित कपूर, शिशीर शर्मा यांच्या मुख्य भूमिका आहेत.

कुठे पाहाल हा सिनेमा?
'राझी' सिनेमा २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता. या सिनेमाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा सिनेमा प्रदर्शित करण्यात आला आहे.