"वेदना होत असतानाही सकाळी ३ वाजेपर्यंत ते...", 'इक्कीस'च्या शूटवेळी 'अशी' होती धर्मेंद्र यांची अवस्था
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 09:59 IST2026-01-08T09:52:19+5:302026-01-08T09:59:46+5:30
"त्यांना उठायला-बसायला त्रास व्हायचा, पण तरीही...", 'इक्कीस'च्या कोरिओग्राफरने सांगितला धर्मेंद्र यांचा भावुक किस्सा

"वेदना होत असतानाही सकाळी ३ वाजेपर्यंत ते...", 'इक्कीस'च्या शूटवेळी 'अशी' होती धर्मेंद्र यांची अवस्था
Dharmendra: बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचं २४ नोव्हेंबर रोजी निधन झालं. त्यांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली. धर्मेंद्र यांनी त्यांच्या मुंबईतील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांचा शेवटचा चित्रपट इक्कीस हा १ जानेवारी २०२६ या दिवशी प्रदर्शित झाला.हा चित्रपट भावनिकदृष्ट्या चाहत्यांसोबत जोडला गेला आहे. या चित्रपटात धर्मेंद्र यांच्या अगस्त्य नंदा, जयदीप अहलावत आणि सिमर भाटिया असे कलाकार आहेत. अलिकडेच धर्मेंद्र यांच्या 'इक्कीस' या चित्रपटाचे नृत्यदिग्दर्शक विजय गांगुली यांनी धर्मेंद्र यांची भावुक आठवण शेअर केली आहे. शेवटच्या क्षणी त्यांनी उभं राहणंही कठिण जात होतं.मात्र, त्यांची कामाप्रती असलेली निष्ठा आणि प्रामाणिकपणा त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती.
पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीमध्ये कोरिओग्राफर विजय गांगुली यांनी धरमपाजी यांची भावुक करणारी आठवण सांगितली. या मुलाखतीमध्ये बोलताना ते म्हणाले,"चित्रपटातील कॉलेज रियुनियनचा एक प्रसंग पहाटे सुमारे २:३० ते ३:०० च्या दरम्यान शूट करण्यात आला, ज्यामध्ये धर्मेंद्र यांना काही डान्स स्टेप्स करायच्या होत्या.असं असूनही ते संपूर्ण निष्ठेने आपलं काम करत होते. त्यानंतर विजय यांनी म्हटलं की,"टीमने धर्मेंद्र यांना सांगितलं होतं की त्यांना फक्त जास्त हालचाल करायची नाही, परंतु ते फार उत्साहाने काम करत होते आणि इतर कलाकार कसे डान्स स्टेप्स करत आहेत याकडे कुतुहलाने पाहत होते. मात्र, धर्मेंद्र यांनी टीमचा तो सल्ला ऐकला नाही आणि ते डान्स करण्याचा हट्ट धरु लागले. जेव्हा धर्मजींसारख्या व्यक्तीला तुम्ही या वयात इतक्या उत्साहाने काम करताना पाहता, तेव्हा जाणवतं की जर ते या वयात हे सर्व करू शकत असतील, तर आपण का नाही."
त्यानंतर धर्मेंद्र यांच्या सेटवरील आठवणी शेअर करत ते म्हणाले, धर्मेंद्र बराच वेळ एकाच ठिकाणी बसून राहायचे आणि त्यांना उठायला त्रास व्हायचा.पण जेव्हा त्यांचा सीन आला तेव्हा त्यांनी ते केलं. पुन्हा पुन्हा रिटेक घेतल्यामुळे त्यांना थकवा येऊ नये म्हणून आम्ही त्यांना थांबवले. पण,त्यांच्यासाठी हे महत्त्वाचं होतं की त्यांनी आपले 100 टक्के द्यावे. त्यांना असं वाटू नये की ते हे करू शकत नाहीत.मुळात त्यांची वृत्ती हीच होती, “मी करून दाखवेन.” असा भावुक किस्सा विजय गांगुली यांनी शेअर केला.