लॉरेन्स-आरजू बिश्नोई गँगच्या शूटरला अटक; रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबाराची घेतलेली सुपारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2026 11:39 IST2026-03-29T11:37:19+5:302026-03-29T11:39:36+5:30
Rohit Shetty : प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घरावर गोळीबार करण्याची सुपारी घेतल्याचा आरोप आहे.

फोटो - ndtv.in
राजस्थानमधील श्रीगंगानगर येथे शुक्रवारी रात्री साधुवाली चेक पोस्टवर झालेल्या पोलीस चकमकीत एका गुंडाला अटक करण्यात आली आहे. हा गुंड लॉरेन्स आणि आरजू बिश्नोई गँगचा शार्पशूटर आकाश असल्याचं समोर आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्याने प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घरावर गोळीबार करण्याची सुपारी घेतल्याचा आरोप आहे. तो गँगस्टर आरजू बिश्नोईच्या थेट मार्गदर्शनाखाली काम करत होता. रेकी करणं आणि गोळीबाराच्या घटना घडवून आणणं हे आकाशचं मुख्य काम होतं. त्याच्यावर राजस्थान, उत्तर प्रदेश आणि पंजाबसह अनेक राज्यांत गुन्हे दाखल आहेत.
पंजाबच्या बाजूने विना नंबर प्लेटच्या बाईकवरून हा शूटर येत होता. पोलिसांनी त्याला थांबण्याचा इशारा केला असता, त्याने पोलिसांच्या दिशेने तीन राऊंड फायर केले. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एक गोळी त्याच्या पायाला लागली, ज्यामुळे तो गंभीर जखमी होऊन खाली पडला. शनिवारी (२९ मार्च) आयजी ओम प्रकाश यांनी माहिती दिली की, जखमी आकाश (३२) हा उत्तर प्रदेशातील आग्रा येथील रहिवासी असून तो लॉरेन्स बिश्नोई गँगचा एक्टिव्ह सदस्य आहे.
आयजींनी सांगितलं की, आकाश हा एक प्रोफेशनल शूटर आहे, जो रेकी केल्यानंतर मोठे गुन्हे करत होता. श्रीगंगानगरमध्ये तो आरजू बिश्नोईच्या सांगण्यावरून एका गँगस्टरची आणि एका व्यावसायिकाची हत्या करण्यासाठी आला होता. याची कुणकुण लागताच पोलिसांनी साधुवाली चेक पोस्टवर नाकेबंदी केली होती. पोलिसांच्या अचूक प्रत्युत्तरामुळे आकाश जखमी झाला असून सध्या त्याच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कोतवाली पोलीस ठाण्याने २३ मार्च रोजी जयपूर सेंट्रल जेलमधून शिवा गुर्जर (२०) याला प्रॉडक्शन वॉरंटवर अटक केली आहे. शिवा गुर्जरवरही रेकी आणि शस्त्र पुरवठ्याचे अनेक गुन्हे दाखल आहेत. आकाश आणि शिवा हे दोघे चांगले मित्र असून आरजू बिश्नोईच्या सांगण्यावरूनच ते काम करतात. तुरुंगात असलेला लॉरेंस बिश्नोई या दोघांना 'टार्गेट' देत असे. शिवा हा देखील आग्रा येथीलच रहिवासी आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश आणि शिवा गुर्जर यांनी रोहित शेट्टी यांच्या मुंबईतील घराबाहेर गोळीबार करण्याची सुपारी घेतली होती. आरजू बिश्नोईने त्यांना हे काम सोपवलं होतं. हे दोन्ही आरोपी सोशल मीडियाच्या माध्यमातून आरजूच्या संपर्कात होते आणि आरजू परदेशात बसून त्यांना सूचना देत होता. पोलीस आता आकाश आणि शिवा यांची कसून चौकशी करत आहेत. या चकमकीमुळे आणि अटकेमुळे लॉरेन्स-आरजू बिश्नोई गँगच्या रेकी आणि शूटिंग मॉड्यूलचा मोठा खुलासा झाला आहे.