'देशात केवळ १ टक्का लोक आहेत जे...' ; शास्त्रीय संगीताविषयी लतादीदींच्या भाचीचं धक्कादायक वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2022 11:49 IST2022-06-26T11:48:54+5:302022-06-26T11:49:39+5:30
Radha Mangeshkar: नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त करत त्यांना ट्रोलही केलं आहे.

'देशात केवळ १ टक्का लोक आहेत जे...' ; शास्त्रीय संगीताविषयी लतादीदींच्या भाचीचं धक्कादायक वक्तव्य
आपल्या गाण्यामुळे संगीतविश्व समृद्ध करणाऱ्या लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचं निधन होऊन बराच काळ झाला. परंतु, आजही त्यांची सोशल मीडियावर त्यांची चर्चा रंगते. मात्र, यावेळी त्यांची भाची राधा मंगेशकर (Radha Mangeshkar) चर्चेत आली आहे. एका कार्यक्रमात राधा यांनी धक्कादायक वक्तव्य करुन नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. इतकंच नाही तर नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त करत त्यांना ट्रोलही केलं आहे.
२४ जून रोजी इंदूरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात राधा मंगेशकर सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांनी शास्त्रीय संगिताविषयी एक धक्कादायक विधान केलं.याविषयी दैनिक भास्करने वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
काय म्हणाल्या राधा मंगेशकर?
"सध्याच्या काळात लोक शास्त्रीय संगीत ऐकत नाहीत. देशात केवळ १ टक्का लोक आहेत जे शास्त्रीय संगीत ऐकतात. त्यामुळे जे चाहत्यांना ऐकायला आवडतं, तेच मीदेखील गाते. शास्त्रीय गायकीमधून लोकांचा रस कमी झाला आहे. मला सुगम संगीत गाण्यात आनंद आहे", असं राधा मंगेशकर म्हणाल्या.
दरम्यान, लता मंगेशकर यांच्याविषयीदेखील राधा यांना काही प्रश्न विचारण्यात आले. मात्र, याविषयी भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला. राधा मंगेशकर या संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांची लेक आहेत. राधा मंगेशकर यांनी केलेलं हे वक्तव्य २४ तारखेच्या एक दिवस आधी पत्रकारांशी संवाद साधताना केलं होतं. त्यामुळे नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त करत त्यांना ट्रोल केलं आहे.