"आर्यनने त्याच्या दु:खावर सर्वांना हसवलं...", लक्ष्य लालवानीने केलं शाहरुखच्या लेकाचं कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 12:38 IST2025-10-20T12:37:29+5:302025-10-20T12:38:04+5:30
आर्यन खान म्हणालेला, "मी असा शो बनवेन ज्याची..."

"आर्यनने त्याच्या दु:खावर सर्वांना हसवलं...", लक्ष्य लालवानीने केलं शाहरुखच्या लेकाचं कौतुक
बॉलिवूडमधला उभरता कलाकार म्हणून अभिनेता लक्ष्य लालवानी सध्या नावारुपाला येत आहे. आधी 'किल' सिनेमातून त्याने अभिनयाचं आणि अॅक्शन कौशल्यही दाखवलं. तर नुकताच तो आर्यन खानच्या बहुचर्चित 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत दिसला. यातही त्याच्या अभिनयाचं सगळीकडे कौतुक होत आहे. सोबतच आर्यन खानची ही पहिलीच दिग्दर्शित सीरिज आहे. नुकतंच लक्ष्यने आर्यन खानचं कौतुक करताना त्याला चांगला अभिनेताही म्हटलं आहे.
राज शमानीला दिलेल्या मुलाखतीत लक्ष्य लालवानीने आर्यन खानवर स्तुतीसुमनं उधळली. तो म्हणाला, "असे खूप कमी लोक असतात ज्यांना भेटून असं वाटतं की यांच्यात जग बदलण्याची ताकद आहे. आर्यन खान त्यापैकीच एक आहे. त्याच्यात अपार इच्छाशक्ती आहे. स्क्रिप्ट वाचण्याआधीच मला याची खात्री होती की हा काहीतरी विशेष बनवणार आहे. त्याच्यात तो जोश, आक्रमकता, जिद्द आणि दृढ विश्वास होता जो प्रत्येक दिग्दर्शकामध्ये नसतो."
तो पुढे म्हणाला, "जेव्हा एखादा सिनेमा हिट होतो तेव्हा मग बरेच मेकर्स त्याचप्रकारचा कंटेंट बनवायला जातात. पण आर्यन म्हणाला, 'नाही, मी एक अशा शो बनवेन ज्याची सगळीकडे चर्चा होईल.' त्याला त्याच्या गोष्टीवर विश्वास होता आणि त्याने आम्हाला सगळ्यांनाही ते पटवून दिलं. त्याने खूप काही सहन केलं आहे. त्यामुळे नंतर तो खरं तर काहीही करु शकत होता. मात्र त्याने लोकांना आपल्या दु:खावर हसायला लावलं. त्याने स्वत:चीच काय शाहरुख सरांचीही खिल्ली उडवली. तो खूप मजेशीर आणि खोडकर स्वभावाचा आहे. तो नेहमी आम्हाला सीन कसा करायचा आहे हे स्वत: अभिनय करुन दाखवायचा. मुलींच्या भूमिकाही करायचा. तो खूप चांगला अभिनेता आहे."