'भारतावर आक्रमण करणाऱ्या त्या लंगड्याचंच नाव...", कुमार विश्वास यांचा सैफ-करीनावर निशाणा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 11:11 IST2025-01-03T11:09:48+5:302025-01-03T11:11:12+5:30
ते म्हणाले, "मायानगरीमध्ये बसलेल्या लोकांना हे समजून घ्यावं लागेल की देशाला काय हवं आहे..."

'भारतावर आक्रमण करणाऱ्या त्या लंगड्याचंच नाव...", कुमार विश्वास यांचा सैफ-करीनावर निशाणा?
आपल्या बेधडक वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असलेले कवी कुमार विश्वास (Kumar Vishwas) यांनी पुन्हा एक विधान केलं आहे. काही दिवसांपूर्वीच सोनाक्षी सिन्हाला सुनावणाऱ्या कुमार विश्वास यांनी आता नाव न घेता सैफ अली खान-करीना कपूरच्या मुलाच्या नावावर आक्षेप घेतला आहे. भारतावर आक्रमण करणाऱ्या त्या लंगड्याचंच नाव मुलाला द्यायचं होतं का असं ते म्हणाले आहेत. तसंच हे विधान करत त्यांनी मायानगरीवर निशाणा साधला आहे.
उत्तर प्रदेशमधील मुरादाबाद येथील एका कार्यक्रमाला संबोधित करताना कुमार विश्वास म्हणाले, "मायानगरीमध्ये बसलेल्या लोकांना हे समजून घ्यावं लागेल की देशाला काय हवं आहे. आम्हीच तुम्हाला प्रसिद्धी द्यायची, तुमच्या सिनेमाची तिकीटं काढायची, तुम्हाला हिरो-हिरोईन आम्ही बनवायचं आणि तुम्ही तुमच्या तिसऱ्या लग्नातून झालेल्या मुलाचं नाव तुम्ही बाहेरुन आलेल्या आक्रमणकर्त्यावर ठेवणार हे चालणार नाही. इतकी वेगळी नावं आहेत काहीही ठेवू शकला असता. रिझवान, उस्मान, युनूस ठेवायचं. तुम्हाला एकच नाव मिळालं? ज्या बेशिस्त, लंगड्या माणसाने हिंदुस्तानात येऊन महिलांवर बलात्कार केला. आपल्या गोंडस मुलाचं नाव ठेवण्यासाठी असा लफंगाच मिळाला का? आता जर याला तुम्ही हिरो बनवाल तर आम्ही त्याला खलनायकही होऊ देणार नाही. भारताची जनता जागृक आहे. हा नवा भारत आहे."
कुमार विश्वास यांनी थेट सैफ करीनाचं आणि तैमुरचं नाव घेतलं नाही. मात्र त्यांचा रोख त्याच नावावर होता हे स्पष्ट कळतं. २०१६ मध्ये करीनाने तैमुरला जन्म दिला. त्याच्या नावावरुन तेव्हा खूप टीका झाली होती. अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते. मात्र नंतर हा वाद आपोआप शांत झाला होता. तैमुरची लोकप्रियता तर खूप वाढली होती. त्याचा गोंडस चेहरा पाहून सगळेच नंतर शांत झाले. मात्र आता कुमार विश्वास यांनी पुन्हा एकदा तो वाद उकरुन काढला आहे.