तुम्ही मोठे लोक, असा छोटेपणा कशाला करता? 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधल्या प्रकरणावरुन क्रांतीची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 17:17 IST2025-12-10T17:16:58+5:302025-12-10T17:17:36+5:30
किती जिव्हारी लागलंय तुमच्या? ठिके, आता केस तर सुरु आहे...

तुम्ही मोठे लोक, असा छोटेपणा कशाला करता? 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधल्या प्रकरणावरुन क्रांतीची प्रतिक्रिया
शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला २०२१ साली ड्र्ग्स प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंनी ताब्यात घेतलं होतं. हे प्रकरण आजपर्यंतचं सर्वात चर्चेतलं प्रकरण होतं. नंतर इतक्या वर्षांनी नुकतीच आर्यनने 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' ही सीरिज बनवली. यामध्ये त्याने समीर वानखेंडेंचं विडंबन केलं होतं. यानंतर वानखेडेंनी मानहानीची केस दाखल केली. आता या प्रकरणावर क्रांती रेडकरने प्रतिक्रिया दिली आहे.
'इसापनीती'ला दिलेल्या मुलाखतीत क्रांती रेडकर म्हणाली, "या सगळ्याचा त्रास होतोच. मीही क्रिएटिव्ह क्षेत्रातलीच आहे. मी त्यांचं वाईट चिंतत नाही. तुम्ही छान कंटेंट बनवता ना, तुमच्या पद्धतीने बनवता ना; बनवा की. चांगला कंटेंट बनवा. लोकांचं मनोरंजन होईल असा बनवा. पण कोणाच्यातरी डोक्यावर पाय ठेवून त्याला पाण्यात बुडवून तुम्ही मोठे व्हायचा का प्रयत्न करता? तुम्ही मोठेच आहात. तुम्हाला या सगळ्या गोष्टीची काही गरज नाही. मोठे व्हा...आकाश मोठं आहे. तो फक्त एक छोटा अधिकारी आहे आणि मी त्याची छोटीशी बायको. किती वर्ष तुम्ही ते धरुन बसणार आहात. तुम्हाला उत्तम बनवायचं तर बनवा, एका शासकीय ऑफिसरची नक्कल करत आहात. किंवा देशातील सर्वच अधिकाऱ्यांची तुम्ही नक्कल करताय? कशाकशाचा अपमान करणार आहात? याला कुठेतरी मर्यादा हव्या. अशी खिल्ली उडवून आपण छोटे होत असतो. छोटे नका होऊ, मोठे व्हा."
ती पुढे म्हणाली,"किती जिव्हारी लागलंय तुमच्या? ठिके, आता केस तर सुरु आहे. पण खरं सांगायचं तर ही केस समीर वानखेंडेंची एकट्याची नाही. ही त्या संस्थेची, तिथल्या सर्व मेहनत करणाऱ्या अधिकाऱ्यांची आहे. एनसीबीमध्ये ते २६ अधिकारी काम करत होते त्या प्रत्येकाच्या मानहानीची केस आहे. कारण सगळ्यांचे बायका पोरं घरी असायचे आणि हे चार चार दिवस ऑपरेशनला असायचे. बिना सुरक्षेचे हे डोंगरीमध्येही घुसायचे. दाऊदच्या गँगला संपवलेली ही टीम आहे त्यांची तुम्ही खिल्ली उडवता? दुसरा ऑफिसर का असा विचार करेल की चला आपणही चांगलं काम करुया. कारण नंतर आपली खिल्लीच उडवली जाणार आहे. बॉलिवूडला लक्ष्य करण्याचा मुद्दाच नाही. आधीच्या साडेतीन हजार केसेस होत्या त्या काय बॉलिवूडच्या होत्या? आता मानहानीच्या केसचा निकाल काय येईल तो येईल पण केस करण्याचा उद्देश हा होता की प्रत्येक कलाकृतीत जाऊन तुम्ही कुठेतरी काहीतरी भाष्य करताय. बाप-बेटाचा डायलॉग काय काय गरज आहे तुम्हाला? तुम्ही नंबर १ माणसं आहात. असं छोटे असल्यासारखं वागू नका. खेळाडूवृत्ती ठेवा."