कधी झाला नाच्या तर कधी झाला गावासमोर नग्न; 'जवान'मधील त्या शेतकऱ्यासाठी किरण मानेंची खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2023 17:31 IST2023-09-18T17:28:30+5:302023-09-18T17:31:51+5:30

Jawan: या सिनेमामध्ये एका अभिनेत्याने शेतकऱ्याची भूमिका साकारली असून समाजातील सत्य परिस्थिती दाखवली आहे.

kiran-mane-talk-about-jawan-actor-who-played-role-of-farmer-onkar-das-manipuri | कधी झाला नाच्या तर कधी झाला गावासमोर नग्न; 'जवान'मधील त्या शेतकऱ्यासाठी किरण मानेंची खास पोस्ट

कधी झाला नाच्या तर कधी झाला गावासमोर नग्न; 'जवान'मधील त्या शेतकऱ्यासाठी किरण मानेंची खास पोस्ट

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान (shahrukh khan) याचा जवान (jawan) हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर तुफान गाजत आहे.  या सिनेमाने जगभरातून जवळपास ८०० कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे हा सिनेमा सध्या चांगलाच सुपरहिट ठरत आहे. या सिनेमातील शाहरुखसह अन्य कलाकारांच्याही भूमिका प्रेक्षकांच्या चांगल्याच स्मरणात राहिल्या आहेत. यामध्ये खासकरुन अभिनेता ओंकारदास माणिकपुरी  याचं सर्व स्तरांमधून कौतुक करण्यात आलं. या सिनेमात एक लहानशी पण तगडी भूमिका साकारुन त्याने समाजाच्या डोळ्यात अंजन घातलं. त्यामुळेच त्याचा अभिनय पाहून भारावून गेलेल्या किरण माने (kiran mane) यांनी त्याच्यासाठी एक पोस्ट लिहिली आहे.

काय आहे किरण माने यांची पोस्ट?

'जवान' मध्ये एका दलित शेतकर्‍याला छितपुट कर्जाच्या वसुलीसाठी त्याच्या बायको, मुलीसमोर आणि गांवासमोर नग्न करून मारहाण केली जाते. ट्रॅक्टर ओढून नेला जातो. तरीही तो रडणार्‍या बायकोवर खेकसतो, "तोंड बंद ठेव. पोरीची परीक्षा आहे ना?"... रडणार्‍या मुलीला शांत करत, "काही विशेष नाही गं त्यात. माझीच चूक होती. तू जा. पेपर दे नीट." असं म्हणत कॉलेजला पाठवतो..., ...आणि स्वत:ला गळफास लावून घेतो. यानंतर पिच्चरमध्ये शाहरूख आपल्याला भानावर आणतो. देशातल्या शेतकर्‍यांचं वास्तव सांगतो. नंतर पिच्चरभर तो अनेक रूपांत जलवा दाखवतो. विजय सेतूपती आग ओकतो. नयनतारा लख्खपणे चमकते. दिपीका पदुकोन सुखावून जाते. अनेक अनेक कलाकार येऊन जातात. तरीही एवढ्या मोठ्या तगड्या,चकचकीत स्टारकास्टमध्ये या सिनमधला हा साधासुधा शेतकरी, त्याचा केविलवाणा तरीही स्वाभिमानी चेहरा प्रेक्षकांच्या मनामेंदूवर कोरला जातो... नीट लक्षात रहातो. एवढा प्रभावी अभिनय या अभिनेत्यानं केलाय.

ओंकारदास माणिकपुरी असं या अभिनेत्याचं नांव. छत्तीसगढमधल्या एका छोट्या खेड्यातल्या गरीब शेतकर्‍याचा पोरगा. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यानं गांवाकडच्या 'नाटक मंडली'त काम करायला सुरूवात केली. 'नाच्या' म्हणून. उघड्या मैदानात होणार्‍या नाटकाला प्रेक्षक जमवण्यासाठी गाणी म्हणायची, जोक सांगायचे, मिमिक्री करायची, हे त्याचं काम. एक दिवस तो प्रख्यात नाट्य दिग्दर्शक हबीब तन्वीर यांच्या नजरेस पडला. तिथून पुढं त्यानं मागं वळून नाय पाहिलं भावांनो. उत्तरेकडच्या अभिजात नाटकांमध्ये त्याचं नांव आज लै मानानं घेतलं जातं. यापूर्वी तो आमीर खानच्या 'पीपली लाईव्ह' सिनेमातबी आपल्याला दिसला होता.

आपल्याकडे गांवखेड्यांत तमाशातली वगनाट्यं, लोकनाट्यं, कलापथकं यात काम करणारे असे लै लै लै भन्नाट अभिनेते आहेत. ज्यांना योग्य दिग्दर्शकानं मार्गदर्शन केलं, एक संधी मिळाली तर ते त्याचं सोनं करतील. इरफान खान, नवाज, संजय मिश्रा, पंकज त्रिपाठी या उत्तरेकडच्या गांवातल्या पोरांनी जत्रेतल्या नाटकांपास्नं सुरूवात करून हे सिद्ध केलंय.

ग्रामीण मातीतनंवर आलेल्या ओंकारदासला यापुढेही अशा अनेक संधी मिळोत. थिएटरचा पाया असलेले, अभिनयाला अतिशय गांभीर्यानं घेणारे असे पॅशनेट नट भारतीय सिनेमा समृद्ध करणार आहेत... गांवखेड्यातल्या प्रतिभावानांना प्रेरणा देणार आहेत. सलाम ओंकारदास...कडकडीत सलाम ! - किरण माने.
 

Web Title: kiran-mane-talk-about-jawan-actor-who-played-role-of-farmer-onkar-das-manipuri