ठरलं! संजय दत्तच्या 'खलनायक'चा सीक्वेल येणार, माधुरी दीक्षितसोबत पुन्हा दिसणार बल्लू बलराम?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 09:53 IST2025-05-27T09:52:32+5:302025-05-27T09:53:23+5:30
दिग्दर्शक सुभाष घईंनी केलं कन्फर्म, 'खलनायक २'च्या सीक्वेलबद्दल म्हणाले...

ठरलं! संजय दत्तच्या 'खलनायक'चा सीक्वेल येणार, माधुरी दीक्षितसोबत पुन्हा दिसणार बल्लू बलराम?
'नायक नही...खलनायक हू मै'... हे गाणं वाजलं की संजय दत्तचा (Sanjay Dutt) 'खलनायक' (Khalnayak) सिनेमा डोळ्यासमोर येतो. १९९३ साली आलेल्या सिनेमात संजय दत्त आणि माधुरी दीक्षितची जोडी होती. माधुरीचं 'चोली के पिछे क्या है' हे गाणंही तुफान हिट झालं. सिनेमात जॅकी श्रॉफ, राखी. राम्या कृष्णन यांचीही भूमिका होती. बल्लू, राम आणि गंगा यांची ती कहाणी होती. आता याच सिनेमाचा सीक्वेल येणार आहे. दिग्दर्शक सुभाष घईंनी (Subhash Ghai) याबद्दल कन्फर्मेशन दिलं आहे.
आजकाल सीक्वेलच्या जमान्यात अनेक गाजलेल्या सिनेमांच्या सीक्वेलची चर्चा सुरु असते. सुभाष घईंना अनेकदा 'खलनायक'च्या सीक्वेलबद्दल विचारणा झाली. आता नुकतंच त्यांनी यावर कन्फर्मेशन दिलं आहे. 'टाईम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, "हो, येत्या काळात खलनायक २ नक्की घेऊन येणार आहे. सिनेमाच्या स्क्रिप्टचं काम फायनल झालं आहे. आता सिनेमातील स्टारकास्टची निवड करणं हे आमच्यासमोर आव्हान आहे. याशिवाय तांत्रिक गोष्टीही पूर्ण करायच्या आहेत. संजय दत्त आणि माधुरी या सीक्वेलमध्ये काम करण्यासाठी तयार व्हावेत यासाठी मी पूर्ण प्रयत्न करेन."
'खलनायक' ९० च्या दशकातील ब्लॉकबस्टर सिनेमा होता. संजय दत्तने अँटी हिरो बल्लू बलरामचं काम केलं होतं. या भूमिकेतून त्याने प्रेक्षकांवर छाप पाडली होती. माधुरी दीक्षित गंगा या महिला पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत होती जी बल्लूला पकडण्यासाठी त्याच्यासोबत असल्याचं नाटक करत असते. तर जॅकी श्रॉफ राम या पोलिस अधिकाऱ्याची भूमिकेत होता. अभिनेता प्रमोद मुथू खलनायक होता.
अभिनेता संजय दत्त आगामी काही सिनेमांमध्येही दिसणार आहे. यामध्ये 'हाऊसफुल ५', रितेश देशमुखचा 'राजा शिवाजी' हे सिनेमे आहेत. तसंच सलमान खानसोबतही त्याचा सिनेमा येणार आहे ज्याचं टायटल अद्याप समोर आलेलं नाही.