कंगना राणौतला मिळणार का ‘मणिकर्णिका’च्या सहदिग्दर्शनाचे क्रेडिट? जाणून घ्या उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2018 13:50 IST2018-11-01T13:50:01+5:302018-11-01T13:50:34+5:30
‘मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी’ या चित्रपटातील अभिनयासोबत याच्या दिग्दर्शनावरूनही कंगना सध्या चर्चेत आहे.

कंगना राणौतला मिळणार का ‘मणिकर्णिका’च्या सहदिग्दर्शनाचे क्रेडिट? जाणून घ्या उत्तर
‘मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी’ या चित्रपटाचा टीजर पाहिल्यानंतर कंगना राणौतच्या या चित्रपटाकडे सगळे नजरा लावून बसले आहेत. या चित्रपटातील अभिनयासोबत याच्या दिग्दर्शनावरूनही कंगना सध्या चर्चेत आहे. क्रिश हे या चित्रपटाचे अधिकृत दिग्दर्शक आहेत. त्यांच्या दिग्दर्शनाखाली चित्रपट पूर्ण झाल्यानंतर निर्मात्यांनी चित्रपटात काही पॅचवर्क व नवे सीन्स टाकण्याचा निर्णय घेतला. पण तोपर्यंत क्रिश आपल्या दुस-या प्रोजेक्टमध्ये बिझी झालेत. त्यांच्या अनुपस्थित चित्रपटाचे काम कोण पुढे नेणार हा प्रश्न असताना कंगनाने या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची सगळी सूत्रे आपल्या हातात घेतली. यानंतर चित्रपटाच्या क्रेडिट लाईनमध्ये दिग्दर्शकाच्या नावावरून वेगवेगळी चर्चा सुरू झाली. क्रेडिट लाईनमध्ये कंगनाचे नाव असेल, असे काहींनी म्हटले. काहींनी ती सहदिग्दर्शक म्हणून क्रेडिट घेणार, असे सांगितले तर काहींनी दिग्दर्शनाचे क्रेडिट घेण्यास कंगनाने नकार दिल्याचेही सांगितले. पण आता ताज्या बातमीनंतर सगळे काही स्पष्ट झाले आहे.
मिड डेने दिलेल्या वृत्तानुसार,कंगनाने ४५ दिवसांपर्यंत चित्रपटाचे शूटींग सांभाळले. यादरम्यान तिने अनेक महत्त्वपूर्ण दृश्ये नव्याने चित्रीकरण केलीत. यानंतर चित्रपटाच्या एडिटींगचा जिम्माही तिने सांभाळला. केवळ इतकेच नाही तर व्हिएफएक्स, म्युझिक व फायनल कटचे कामही तिने पाहिले. ही सगळी दिग्दर्शकाची जबाबदारी असते. कंगनाच्या या कामावर चित्रपटाचे निर्माते जाम खूश आहेत. को-प्रोड्यूसर कमल जैन यांनी सांगितले की, कंगना एक परफेक्शनिस्ट आहे आणि तिने प्रत्येक जबाबदारी अगदी जीव ओतून सांभाळली. तिचे काम बघून आम्ही खूश आहोत. आम्ही कल्पना केली होती,मणिकर्णिका अगदी तसाच बनला. अशास्थितीत कंगनाला तिच्या कामाचे क्रेडिट दिले जाणार नसेल तर ते चुकीचे होईल. एकंदर सांगायचे तर, कंगनाना दिग्दर्शनाचे क्रेडिट देण्याचा निर्णय मणिकर्णिकाच्या निर्मात्यांनी घेतला आहे. म्हणजे, अभिनेत्रीशिवाय लवकरच कंगना दिग्दर्शक म्हणूनही ओळखली जाणार आहे.