धर्मेंद्र यांच्या प्रार्थना सभेत कंगना राणौत झाली भावुक, म्हणाली "ते शेवटपर्यंत मातीशी जोडलेले"
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 12:57 IST2025-12-12T12:57:04+5:302025-12-12T12:57:35+5:30
धर्मेंद्र यांच्या आठवणीत आयोजित करण्यात आलेल्या प्रार्थना सभेत अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौत अत्यंत भावनिक झाल्याचे पाहायला मिळाले.

धर्मेंद्र यांच्या प्रार्थना सभेत कंगना राणौत झाली भावुक, म्हणाली "ते शेवटपर्यंत मातीशी जोडलेले"
Kangana Ranaut mourns Dharmendra : हिंदी चित्रपटसृष्टीचे महानायक धर्मेंद्र यांच्या निधनानंतर संपूर्ण चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. धर्मेंद्र यांचे २४ नोव्हेंबर २०२५ रोजी ८९ व्या वर्षी प्रदीर्घ आजारानंतर निधन झाले. ६५ वर्षांहून अधिक काळ चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या या दिग्गज अभिनेत्याला निरोप देऊन दोन आठवड्यांहून अधिक काळ लोटला आहे. नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या प्रार्थना सभेत अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौत अत्यंत भावनिक झाल्याचे पाहायला मिळाले.
धर्मेंद्र यांच्या पत्नी, अभिनेत्री हेमा मालिनी यांनी आयोजित केलेल्या या खास सभेला बॉलिवूडमधील अनेक कलाकार उपस्थित होते. यावेळी कंगना राणौतने धर्मेंद्र यांच्या प्रवासाविषयी बोलताना आपले मन मोकळे केले आणि त्यांचे यश आपल्यासाठी किती महत्त्वाचे आहे, हे सांगितले.
कंगना म्हणाली, "धर्मेंद्र एका लहान गावातून मुंबईत आले आणि त्यांनी केवळ आपल्या कठोर परिश्रमाने सुपरस्टारपद मिळवले. त्यांचा संघर्ष मला माझ्या स्वतःच्या आयुष्याची आठवण करून देतो. त्यांनी केलेले कठोर परिश्रम आणि त्यांचे प्रामाणिक व्यक्तिमत्त्व हेच त्यांच्या यशाचे खरं गुपित होतं. आजच्या काळात अनेक जण आपले मूळ विसरतात, पण धर्मेंद्र शेवटपर्यंत आपल्या मातीशी जोडलेले राहिले".
धर्मेंद्र यांचं कौतुक करत कंगना पुढे म्हणाली, "ते केवळ एक महान अभिनेता नव्हते, तर एक अतिशय दयाळू होते. त्यांच्या जीवनात आलेल्या अडचणी त्यांनी कधीही लपवल्या नाहीत, उलट त्यांना आपली ताकद बनवलं". कंगनाने स्पष्ट केले की, इंडस्ट्रीमध्ये प्रवेश करताना तिलाही अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागले. पण धर्मेंद्र यांच्याप्रमाणेच तिनेही हार न मानता आपली स्वप्ने पूर्ण केली.
