Kangana Ranaut : "मी शाहरुख खानपेक्षा जास्त स्ट्रगल केला"; कंगना राणौतने सांगितलं कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2024 16:01 IST2024-08-19T15:51:28+5:302024-08-19T16:01:06+5:30
Kangana Ranaut And Shah Rukh Khan : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत सध्या तिच्या आगामी 'इमर्जन्सी' चित्रपटामुळे चर्चेत आहे.

Kangana Ranaut : "मी शाहरुख खानपेक्षा जास्त स्ट्रगल केला"; कंगना राणौतने सांगितलं कारण
बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत सध्या तिच्या आगामी 'इमर्जन्सी' चित्रपटामुळे चर्चेत आहे. लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वी कंगनाने स्वत:ला आणि शाहरुख खानला त्यांच्या पिढीतील शेवटचे स्टार असं संबोधलं होतं. आता तिने असं म्हणण्यामागचं कारण सांगितलं आहे. कंगना म्हणते की, ती आणि शाहरुख खान आऊटसाइडर्स आहेत. दोघेही फिल्म इंडस्ट्रीतील नाहीत. तसेच तिचा बॉलिवूडमधील प्रवास हा शाहरुख खानपेक्षा कठीण होता.
राज शमानीच्या पॉडकास्टवर कंगना राणौत म्हणाली की, मी आणि शाहरुख खान आऊटसाइडर्स आहोत. शाहरुख खान हा दिल्लीचा आहे आणि तो फिल्मी बॅकग्राऊंडचा नाही. तो सर्वात टॉप स्टार बनला. तो अशा कुटुंबातून आला आहे जिथे प्रत्येकजण चांगलं इंग्रजी बोलू शकतो. त्याने कॉन्व्हेंटमध्ये शिक्षण घेतलं. दिल्लीहून मुंबईला आल्यावर फारसा फरक पडत नाही, पण मी गावातून आले आहे. मी एक मुलगी आहे. माझा प्रवास जास्त कठीण होता. जास्त स्ट्रगल केला.
कंगना राणौत नव्या पिढीतील कलाकारांबद्दलही बोलली आहे. ती म्हणाली, नव्या पिढीत कोणी स्टार झालंय असं मला वाटत नाही. स्टार्स हे आमच्या पिढीतील आहेत. कोणताही नवा अभिनेता स्टार झाला नाही. मात्र, ते सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. आमच्या काळातही ते खूप कमी झालं होतं. आम्हालाही श्रीदेवी आणि माधुरी दीक्षित यांच्यासारखं स्टारडम मिळालं नाही.
अभिनेत्रीने शाहरुख खानच्या 'पठाण' चित्रपटाच्या यशावर प्रतिक्रिया दिली होती. टाईम्स नाऊशी झालेल्या संवादात ती म्हणाली की, शाहरुख खान यांचे दहा वर्षे चित्रपट चालले नाहीत, मग पठाण चालला. माझे सात-आठ वर्षे चालले नाहीत, नंतर क्वीन हा चित्रपट चालला. त्यानंतर काही चांगले चित्रपट आले. आता इमर्जन्सी येत आहे. तिच्या या चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे.