'कभी खुशी कभी गम' सिनेमाला २४ वर्षे पूर्ण, काजोल म्हणाली -"राहुल कहीं न कहीं तो है"
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 17:14 IST2025-12-15T17:13:19+5:302025-12-15T17:14:15+5:30
Kabhi Khushi Kabhie Gham Movie : निर्माता-दिग्दर्शक करण जोहरचा लोकप्रिय कौटुंबिक चित्रपट 'कभी खुशी कभी गम'ला २४ वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने अभिनेत्री काजोलने एक खास पोस्ट शेअर केली आहे.

'कभी खुशी कभी गम' सिनेमाला २४ वर्षे पूर्ण, काजोल म्हणाली -"राहुल कहीं न कहीं तो है"
९०च्या दशकात अनेक कौटुंबिक आणि मल्टीस्टारर चित्रपट प्रदर्शित झाले, परंतु काही चित्रपट असे होते, जे लोकांच्या मनात एकदा स्थिरावले की कधीच बाहेर पडले नाहीत. असाच एक चित्रपट म्हणजे 'कभी खुशी कभी गम'. ज्यात कुटुंबाचे महत्त्व, श्रीमंत-गरीब यांच्या सीमा ओलांडणारे प्रेम आणि तीन पिढ्यांचा संगम दाखवण्यात आला होता. आज या चित्रपटाला २४ वर्षे पूर्ण झाली असून अभिनेत्री काजोल आणि चित्रपट दिग्दर्शक करण जोहर यांनी सोशल मीडियावर आनंद व्यक्त केला आहे.
काजोलने तिच्या इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत लिहिले की, ''सर्व अंजलींना माझा संदेश, मनमोकळेपणाने आणि अभिमानाने आपल्या गोष्टी बोलत राहा! राहुल कुठेतरी नक्कीच आहे, पण ट्रॅफिकमुळे त्याला कदाचित उशीर झाला आहे.'' तर, करण जोहरने चित्रपटातील काही सीन्स शेअर करत लिहिले, ''इतक्या वर्षांनंतरही हा चित्रपट प्रत्येकाला कुटुंब, प्रेम, खूप आनंद आणि थोड्या दु:खाच्या ताकदीची जाणीव करून देत राहतो.'' या चित्रपटाने शाहरुख खान आणि काजोल यांना आयकॉनिक जोडीच्या रूपात सादर केले, ज्यात काजोलच्या चुलबुल अंदाजाने चाहत्यांचे सर्वाधिक मन जिंकले होते.
एकाच दिवसात ६ कलाकारांना करणने केलं होतं साईन
करण जोहरसाठी देखील हा चित्रपट हृदयाच्या खूप जवळ आहे. त्याने दिग्दर्शक आणि निर्माता सूरज बडजात्या यांना टक्कर देत हिंदी सिनेमाला एक मोठा आणि हिट कौटुंबिक चित्रपट दिला होता. याआधी कौटुंबिक आणि रोमान्सने भरलेल्या चित्रपटांसाठी केवळ सूरज बडजात्याच ओळखले जात होते. करण जोहरने या चित्रपटातील कलाकारांनाही एकाच दिवसात साईन केले होते. निर्मात्याने एका दिवसात चित्रपटातील ६ मोठ्या स्टार्सना साईन केले.
करण जोहर म्हणाला...
करण जोहरने एका मुलाखतीत खुलासा केला होता की, त्यांना चित्रपटात सर्व मोठे स्टार्स घ्यायचे होते. त्याने सांगितले की, ''एका दिवशी तो स्क्रिप्ट घेऊन सर्वप्रथम शाहरुख खानच्या घरी पोहोचला, जिथे त्याने स्क्रिप्ट न वाचताच चित्रपटासाठी 'हो' म्हटले. त्यानंतर काजोलने 'हो' म्हटले, मग ते अमिताभ बच्चन आणि जया यांच्या घरी पोहोचले आणि त्यांना कथा ऐकवली, तेव्हा त्या दोघांनीही चित्रपटासाठी होकार दिला. शेवटी मी हृतिक रोशन आणि करीना कपूरच्या घरी पोहोचलो होतो. चित्रपटाचे टायटल ट्रॅक देखील खूप अडचणींनी शूट झाले होते, कारण त्यावेळी गायिका लता मंगेशकर यांनी गाणे थांबवले होते, पण संगीतकार ललित पंडित यांच्या सांगण्यावरून त्यांनी चित्रपटाचा पहिला टायटल ट्रॅक रेकॉर्ड केला होता.''