"त्यांनी मला सांगितलं कपडे काढ आणि...", जॉनी लिव्हरच्या लेकीला इंटस्ट्रीत आला धक्कादायक अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 17:59 IST2025-07-24T17:58:55+5:302025-07-24T17:59:36+5:30
एका इंटरनॅशनल फिल्ममध्ये मोठी रोल देतो असं म्हणत एकाने जेमीसोबत कास्टिंग काऊचचा प्रयत्न केला. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत जेमी लिव्हरने हा प्रसंग सांगितला.

"त्यांनी मला सांगितलं कपडे काढ आणि...", जॉनी लिव्हरच्या लेकीला इंटस्ट्रीत आला धक्कादायक अनुभव
बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्रींसोबत कास्टिंग काऊचचे प्रसंग घडले आहेत. अनेक अभिनेत्रींनी याबद्दल उघडपणे मुलाखतीत सांगितलं आहे. स्टारकिड आणि सुप्रसिद्ध कॉमेडियन असलेल्या जॉनी लिव्हरची लेक जेमीलाही बॉलिवूडमध्ये कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव आला. एका इंटरनॅशनल फिल्ममध्ये मोठी रोल देतो असं म्हणत एकाने जेमीसोबत कास्टिंग काऊचचा प्रयत्न केला. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत जेमी लिव्हरने हा प्रसंग सांगितला.
वडिलांप्रमाणेच जेमीनेही अभिनयात करिअर करण्याचं ठरवलं. इंडस्ट्रीत येण्याआधी जेमीने कास्टिंग काऊचबद्दल ऐकलं होतं. पण, वडीलच प्रसिद्ध कलाकार असल्याने असं काही आपल्या वाट्याला येईल असं जेमीला वाटलं नव्हतं. सुरुवातीच्या काळात जेमीने काम मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले होते. तेव्हा तिच्याकडे मॅनेजरही नव्हता. जेमीला ऑडिशनसाठी एक फोन आला होता आणि व्हिडीओ कॉलवर ऑडिशन होईल असं सांगण्यात आलं होतं. तिला स्क्रिप्टही देण्यात आली नव्हती. जेव्हा तिने व्हिडीओ कॉल जॉईन केला तेव्हा समोरच्या व्यक्तीचा व्हिडीओ बंद होता. प्रवासात असल्यामुळे कॅमेरा ऑन ठेवला नसल्याचं तिला सांगण्यात आलं.
जेमी म्हणाली, "त्याने मला मी दिग्दर्शक असल्याचं सांगितलं. मी प्रवासात आहे त्यामुळे कॅमेरा ऑन करू शकत नाही असंही ती व्यक्ती म्हणाली. हा एक इंटरनॅशनल सिनेमा आहे. ज्यासाठी आम्ही कास्टिंग करत आहोत. आणि त्या भूमिकेसाठी तू फिट बसत आहेस. पण, काही गोष्टी आम्हाला तपासून पाहायच्या आहेत. हे एक बोल्ड कॅरेक्टर आहे, असं त्यांनी सांगितलं". बोल्ड कॅरेक्टर ऐकल्यानंतर जेमीने त्यांना नेमकं काय करावं लागेल? असं विचारलं. तेव्हा तिला असं सांगण्यात आलं की कल्पना कर की एक ५० वर्षांची व्यक्ती तुझ्यासमोर आहे आणि त्या व्यक्तीला तुला इंप्रेस करायचं आहे. हा एक इंटिमेट सीन असणार आहे.
पुढे जेमी म्हणाली, "मी त्यांना सांगितलं की मी कंमर्टेबल नाही. जर स्क्रिप्ट असेल तर मी फॉलो करेन. पण, ते म्हणाले की स्क्रिप्ट नाही. तुला हे इम्प्रोवाइज करायचं आहे. जर तुला कपडे काढायचे असतील किंवा काही बोलायचं असेल किंवा आणखी काही करायचं असेल तर तू करू शकतेस. हे ऐकल्यानंतर मला कळलं की काहीतरी गडबड आहे. मी त्यांना म्हटलं की मला याबद्दल काहीच सांगितलेलं नाही. तेव्हा ते म्हणाले की ही एक मोठी फिल्म आहे. आम्हाला तुला खरंच कास्ट करायचं आहे. तुझ्यासाठी ही खूप मोठी संधी आहे. मी त्यांना स्पष्ट सांगितलं की तुम्हाला जर मी व्हिडीओ कॉलवर कपडे काढायला हवे असेन तर मी कम्फर्टेबल नाही. आणि मला याबद्दल काही सांगितलेलंही नाही. आता मला तुमच्याशी बोलायचं नाही असं म्हणून मी व्हिडीओ कॉल कट केला".