जावेद अख्तर यांनी मानले महाराष्ट्राचे आभार, म्हणाले "वयाच्या १९ व्या वर्षी मुंबईत आलो अन्..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 11:50 IST2025-10-06T11:49:32+5:302025-10-06T11:50:25+5:30
महाराष्ट्र आणि मुंबईबद्दल काय म्हणाले जावेद अख्तर?

जावेद अख्तर यांनी मानले महाराष्ट्राचे आभार, म्हणाले "वयाच्या १९ व्या वर्षी मुंबईत आलो अन्..."
'शब्दांचे जादूगार' म्हणून जावेद अख्तर यांची ओळख आहे. जावेद अख्तर (Javed Akhtar) बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध लेखक तसंच गीतकारही आहेत. 'संदेसे आते है', 'दो पल', 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा' अशी अनेक सुप्रसिद्ध गाणी लिहिली आहेत. ज्या गाण्यांना आजची पिढी ही ऐकणं पसंत करते. जावेद अख्तर यांचं नाव आज सर्वपरिचित असलं तरी त्यांचा प्रवास हा सोपा नव्हता. जावेद अख्तर १९६० च्या दशकात मुंबईत आले. हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःला सिद्ध करण्यापूर्वी त्यांनी अनेक अडचणींचा सामना केला. काही छोटी कामं केली. गेल्या सहा दशकांहून अधिक काळ चित्रपटसृष्टीत सक्रिय असलेल्या जावेद अख्तर यांनी नुकतंच जुन्या आठवणींना उजाळा देत मुंबई, महाराष्ट्राचे आभार मानले आणि शून्यातून शिखर गाठण्याचा आपला प्रेरणादायी प्रवास उलगडला आहे.
जावेद अख्तर यांनी आपल्या संघर्षाच्या दिवसांची आठवण करून देणारी एक भावनिक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. जावेद अख्तर यांनी त्यांच्या X (पूर्वीचे ट्विटर) पोस्टमध्ये मुंबईतील त्यांच्या पहिल्या दिवसाची आठवण सांगितली आहे. एका ओळीत त्यांनी आपला सुरुवातीचा संघर्ष स्पष्ट केला. त्यांनी लिहिले की, "४ ऑक्टोबर १९६४ रोजी, वयाच्या १९ व्या वर्षी, मी माझ्या खिशात फक्त २७ पैसे घेऊन बॉम्बे सेंट्रल स्टेशनवर पोहोचलो".
पुढे त्यांनी लिहलं, "राहायला घर नाही, हाताला काम नाही आणि खिशात पैसे नाहीत, अशा परिस्थितीत मुंबईत आल्यानंतर बेघरपणा, उपासमार आणि बेरोजगारी यांसारख्या अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. आज जेव्हा मी माझ्या आयुष्याचा विचार करतो, तेव्हा मला वाटते की जीवन माझ्यावर खूप दयाळू आहे".
On 4th October 1964 a 19 year old boy had disembarked at Bombay central station with 27 naya paisa in his pocket . Went through homelessness , starvation , unemployment but when I look at the grand total i feel life has been too kind to me . For that I can not but help but thank…
— Javed Akhtar (@Javedakhtarjadu) October 4, 2025
जावेद यांनी अफाट यश आणि प्रेमासाठी कृतज्ञता व्यक्त केली आहे. त्यांनी मुंबई, महाराष्ट्र आणि देशाचे आभार मानले आहेत. ते म्हणाले, "यासाठी, मी मुंबई, महाराष्ट्र, माझा देश आणि माझ्या कामावर प्रेम करणाऱ्या आणि कौतुक करणाऱ्या सर्वांचे आभार मानल्याशिवाय राहू शकत नाही. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद". त्यांची ही भावनिक पोस्ट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.