"आलियाने मला ब्लॉक करण्याची धमकी दिली" जयदीप अहलावत यांनी सांगितला 'राजी' चा किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2023 16:45 IST2023-10-12T16:44:53+5:302023-10-12T16:45:41+5:30
राजीच्या शूटिंगवेळी मी स्वत:ला पूर्णपणे गुप्तहेराच्या भूमिकेत झोकून दिलं होतं.

"आलियाने मला ब्लॉक करण्याची धमकी दिली" जयदीप अहलावत यांनी सांगितला 'राजी' चा किस्सा
अभिनेत्री आलिया भटच्या (Alia Bhat) करिअरमधील सर्वात महत्वाचा सिनेमा म्हणजे 'राजी' (Raazi). या सिनेमातून तिच्या टॅलेंटची प्रेक्षकांना खरी ओळख झाली. क्युट बबली गर्ल, ग्लॅमरस अशाच भूमिकेत दिसणारी आलिया अचानक गंभीर भूमिकेत दिसली. दिग्दर्शिका मेघना गुलजार यांनी आलियामधल्या या टॅलेंटला जगासमोर आणलं. सिनेमात अभिनेते जयदीप अहलावत (Jaieep Ahlawat) यांचीही भूमिका होती. नुकतंच त्यांनी एका मुलाखतीत आलिया आणि मेघना यांच्याबद्दल एक खुलासा केला. या दोघींनी त्यांचा नंबर ब्लॉक करण्याची धमकी दिली होती.
जयदीप अहलावत म्हणाले, 'राजीच्या शूटिंगवेळी मी स्वत:ला पूर्णपणे गुप्तहेराच्या भूमिकेत झोकून दिलं होतं. मला रात्री भयानक स्वप्न यायचे. माझी भूमिका परफेक्ट व्हावी म्हणून मी गुन्हेगारी, गुप्तहेरबद्दल खूप वाचायचो. म्हणूनच मला स्वप्न पडत होते. एक दिवस मी खडबडून जागा झालो. माझ्या चारही बाजूला लोक बंदूक आणि बॉम्ब घेऊन पळत आहेत असं मला स्वप्नात दिसलं.'
ते पुढे म्हणाले,'मला स्वत:चे चित्रपट पाहायला आवडत नाही. मी स्वत:चेच सुमारे ८० टक्के सिनेमे बघितले नाहीत. उगीच नंतर स्वत:चंच काम चुकीचं वाटतं. पण मी राजी सिनेमा पाहिला. याचं कारण म्हणजे मला मेघना आणि आलिया दोघींनी धमकी दिली होती की जर मी सिनेमा बघितला नाही तर त्या माझा नंबर ब्लॉक करतील. म्हणून मी चौथ्या स्क्रीनिंगवेळी राजी पाहिला.'
जयदीप अहलावत बॉलिवूडमधील अतिशय प्रतिभावान अभिनेते आहेत. त्यांची 'पाताल लोक'ही सिरीजही प्रचंड गाजली होती. नुकताच त्यांचा करिना कपूर आणि विजय वर्मासोबतचा 'जाने जान' सिनेमा रिलीज झाला.