मुलाचं नाव 'वायु', तर आता लेकीचं नावंही आहे खास, प्रसिद्ध अभिनेत्रीने शेअर केला व्हिडिओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2025 11:40 IST2025-07-27T11:39:26+5:302025-07-27T11:40:04+5:30
गेल्या महिन्यातच अभिनेत्रीने लेकीला जन्म दिला. सध्याच्या युनिक, फॅन्सी नावांच्या गर्दीत इशिताने मात्र लेकीला छान, पारंपरिक नाव देण्यालाच प्राधान्य दिलं आहे.

मुलाचं नाव 'वायु', तर आता लेकीचं नावंही आहे खास, प्रसिद्ध अभिनेत्रीने शेअर केला व्हिडिओ
'दृश्यम' सिनेमामुळे प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री इशिता दत्ता दुसऱ्यांदा आई झाली आहे. तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. तर दोनच वर्षांपूर्वी तिला मुलगा झाला होता. त्याचं नाव तिने वायु असं ठेवलं. तर आता तिने सोशल मीडियावरुन लेकीचंही नाव चाहत्यांना सांगितलं आहे. कुटुंबासोबत घरीच छोटंसं बारसं करुन तिने लेकीचं नाव उघड केलं आहे. सध्याच्या युनिक, फॅन्सी नावांच्या गर्दीत इशिताने मात्र लेकीला छान, पारंपरिक नाव देण्यालाच प्राधान्य दिलं आहे.
इशिता दत्ता आणि पती अभिनेता वत्सल सेठ दुसऱ्यांदा आईबाबा झाले आहेत. पहिला मुलगा झाल्यानंतर आता त्यांना कन्यारत्न प्राप्त झालं आहे. यासोबत त्यांचं कुटुंब पूर्ण झालं आहे. लेकीचं घरी बारसं केल्याची झलक त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली. यामध्ये वत्सल बाळाला घेऊन येतो आणि पाळण्यात ठेवतो. यानंतर पाळणा हलवत सगळे कुटुंबीय पारंपरिक गुजराती प्रथेने बाळाचं नाव घेतात. ते म्हणजे 'वेदा'.
हा गोड व्हिडिओ पाहून चाहत्यांनी कुटुंबियांच्या साधेपणाचं कौतुक केलं आहे. तसंच लेकीचं नाव ऐकूनही चाहतेही खूश झालेत. वायु आणि वेदा अशी आता त्यांच्या मुलांची नावं आहेत. इशिताने गेल्या महिन्यातच लेकीला जन्म दिला. महिनाभरानंतर त्यांनी मुलीचं बारसं केलं. तर काही दिवसांपूर्वीच १९ जुलै रोजी त्यांचा लाडका मुलगा वायु दोन वर्षांचा झाला. इशिताने व्हिडिओतून लेकीची झलकही दाखवली आहे. या व्हिडिओवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.