'धुरंधर'चं कौतुक करणाऱ्यांना अभिनेत्यानं झापलं, म्हणाला "खरोखरच लज्जास्पद गोष्ट..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 16:43 IST2025-12-18T16:42:51+5:302025-12-18T16:43:21+5:30
'धुरंधर'चं कौतुक करणाऱ्यांवर अभिनेत्यानं टीका केली आहे.

'धुरंधर'चं कौतुक करणाऱ्यांना अभिनेत्यानं झापलं, म्हणाला "खरोखरच लज्जास्पद गोष्ट..."
दिग्दर्शक आदित्य धरचा 'धुरंधर' हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर सुसाट कामगिरी करत आहे. जगभरात ६०० कोटी रुपयांहून अधिक कमाई करत या चित्रपटाने इतिहास रचला आहे. या चित्रपटाची भारताइतकीच पाकिस्तानमध्ये देखील चर्चा आहे. अनेक पाकिस्तानी कलाकारांनी या चित्रपटाला 'पाकिस्तानविरोधी' ठरवलंय. आता प्रसिद्ध अभिनेता इम्रान अब्बास याने यावरून आपल्याच देशातील नागरिकांना खडे बोल सुनावले आहेत.
इम्रान अब्बासने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत 'धुरंधर' चित्रपटाचे कौतुक करणाऱ्या पाकिस्तानी लोकांवर जोरदार टीका केली. तो म्हणाला, "भारतासह जगभर प्रदर्शित झालेला एक सिनेमा उघडपणे पाकिस्तानविरोधी, आपल्या राष्ट्राविरोधी आणि आपल्या धर्माविरोधी कथानक मांडतोय. खरं तर लाजिरवाणी गोष्ट फक्त हा सिनेमा नाही, तर पाकिस्तानमधील काही लोक आहेत. जी या सिनेमाचं गुणगाण गात आहेत. त्यावर रील्स बनवत आहेत, एआयद्वारे फोटो-व्हिडीओ तयार करत आहेत, कलाकारांचं कौतुक करत आहेत आणि अभिमानाने त्याचा प्रचार करत आहेत".
पुढे तो म्हणाला, "होय, हा सिनेमा चांगल्या दर्जाचा असू शकतो. त्याची निर्मिती गुणवत्ता उच्च असू शकते. पण ते आपल्या स्वाभिमानापेक्षा मोठे असू शकत नाही. एखाद्या राष्ट्र किंवा धर्माविरोधात द्वेष पसरवणाऱ्या सिनेमाचा प्रचार आपण का करावा? जर भारताविरुद्ध असाच चित्रपट पाकिस्तानमध्ये बनवला गेला, तर संपूर्ण भारत तो अजिबात संकोच न करता नाकारेल. जे अगदी बरोबर असेल. इथे आपण अशा चित्रपटाचं कौतुक करतोय, जो आपल्यासाठी एक चपराक आहे. आपण त्याला मनोरंजन म्हणतोय. हा विचारांचा खुलेपणा नाही तर निर्लज्जपणा आहे".

इम्रानने सुशिक्षित लोकांच्या वागण्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तो म्हणाला, "प्रतिष्ठा आणि आत्मसन्मान गमावल्याचं हे लक्षण आहे. यावेळी हेही सिद्ध झालं आहे की याचा शिक्षणाशी काहीही संबंध नाही. कारण मी स्वतः फक्त फक्त अशिक्षित नाही तर तथाकथित सुशिक्षित लोकांनाही हे करताना पाहिलं आहे. मौन बाळगणे कदाचित वाईट असेल, पण आपल्या विरोधातील चित्रपटाचा उत्सव साजरा करणे त्याहूनही वाईट आहे. हे अत्यंत लज्जास्पद आहे", या शब्दात अभिनेत्यानं राग व्यक्त केला.