"लेकाच्या कठीण प्रसंगी देश विरोधात असताना...", शाहरुखबद्दल हिमानी शिवपुरी काय म्हणाल्या?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2025 11:29 IST2025-11-02T11:28:37+5:302025-11-02T11:29:24+5:30
"तो मला अमिताभ बच्चन यांच्यासारखाच वाटतो कारण...", हिमानी शिवपरी यांची प्रतिक्रिया

"लेकाच्या कठीण प्रसंगी देश विरोधात असताना...", शाहरुखबद्दल हिमानी शिवपुरी काय म्हणाल्या?
शाहरुख खान, किंग खान, बादशाह, एसआरके अशआ अनेक नावांनी शाहरुखला ओळखलं जातं. आपल्या अभिनयाने, गुड लूक्सने आणि जेंटलमन अॅटिट्यूडने तो अनेक वर्ष चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. इतक्या वर्षात शाहरुखच्या स्वभावाचे अनेक पैलू आपल्याला दिसले आहेत. त्याचा हजरजबाबीपणा, स्मार्ट उत्तरं यामुळे तो कायम चर्चेतही राहिला आहे. आज शाहरुख खान ६० वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याच्यासोबत अनेक सिनेमांमध्ये काम केलेली अभिनेत्री हिमानी शिवपुरी यांनी शाहरुखची स्तुती केली आहे.
हिमानी शिवपुरी शाहरुखच्या 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'मध्ये होत्या. शाहरुखबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, "प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात एक असा प्रसंग येतो जेव्हा सगळं काही अपेक्षेप्रमाणे घडत नाही. शाहरुखसोबतही असंच झालं. काही सिनेमे चालले काही नाही चालले. पण तो कायमच हसत पुढे गेला. जेव्हा त्याचा मुलगा आर्यन खानवर कठीण प्रसंग आला तेव्हा अख्खा देश शाहरुखविरोधात बोलत होता. पण शाहरुखने एकही शब्द कोणाविरोधात काढला नाही. तो शांत राहिला, त्याने प्रतिष्ठा जपली. तो आपल्या दु:खाचा गोंगाट करत नाही तर त्याला आपली ताकद बनवतो. आजकाल सगळे सोशल मीडियावर व्यक्त होतात पण शाहरुख कायमच गर्दीपेक्षा वेगळा राहिला आहे. त्याला माहित आहे की शांत राहण्यातच सम्मान आहे. तो मला अमिताभ बच्चन यांच्यासारखाच वाटतो. दोघांमध्येही तीच शालीनता आणि गरिमा आहे. असे लोक वादळातही उभे राहतात, कोसळत नाहीत."
तो पुढे म्हणाला, "आजही शाहरुखला पाहिलं की मला तोच मुलगा आठवतो जो सेटवर सगळ्यांना हसवायचा. आता फक्त केस जरा पांढरे झालेत पण त्याचं मन आजही तेजस्वी आहे. त्याच्या हसण्यात खरेपणा आहे, प्रेम आहे. तो फक्त सिनेमांचा नाही तर माणुसकीचाही आयकॉन आहे. मी त्याला मनापासून शुभेच्छा देते. खूश राहा, हसत राहा आणि कायम आपल्या प्रेमाने असंच जगात प्रकाश पसरवत राहा."