काय सांगता! 'या' सिनेमाची हुबेहूब कॉपी आहे सुपरहिट 'हेरा फेरी'; दिग्दर्शक प्रियदर्शन यांची कबूली, म्हणाले-
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 13:52 IST2025-09-25T13:52:20+5:302025-09-25T13:52:53+5:30
सुपरहिट हेरा फेरी सिनेमा या गाजलेल्या सिनेमाचा आहे रिमेक, संवादांचं केलंय भाषांतर, दिग्दर्शक प्रियदर्शनचा खुलासा

काय सांगता! 'या' सिनेमाची हुबेहूब कॉपी आहे सुपरहिट 'हेरा फेरी'; दिग्दर्शक प्रियदर्शन यांची कबूली, म्हणाले-
बॉलिवूडमधील कल्ट कॉमेडी चित्रपट 'हेरा फेरी'च्या चाहत्यांसाठी एक रंजक माहिती समोर आली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी नुकत्याच एका मुलाखतीत खुलासा केला आहे की, ही आयकॉनिक कॉमेडी फिल्म मूळ कथा नव्हती, तर हा चित्रपट एका साउथ सिनेमावर आधारीत होता. जे ऐकून सर्वांना धक्का बसलाय. इतकंच नव्हे 'हेरा फेरी'चे संवाद साउथ सिनेमा बघून भाषांतर केले आहेत. कोणता आहे हा सिनेमा? जाणून घ्या
या सिनेमातून उचलले आहेत 'हेरा फेरी'चे संवाद
प्रियदर्शन यांनी पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, 'अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल यांची प्रमुख भूमिका असलेला 'हेरा फेरी' हा चित्रपट 'रामजी राव स्पीकिंग' (Ramji Rao Speaking) या मल्याळम चित्रपटाची हुबेहूब नक्कल होती. चित्रपटाची प्रत्येक फ्रेम, त्याची सिनेमॅटोग्राफी आणि संपूर्ण कथा जशीच्या तशी घेण्यात आली होती. मी पटकथेत कोणताही बदल केला नाही. माझं मुख्य काम फक्त मल्याळम चित्रपटाचे संवाद हिंदीमध्ये भाषांतरित करणं हे होतं.'' अशा शब्दात प्रियदर्शन यांनी खुलासा केला. 'हेरा फेरी'चे संवाद नीरज वोरा यांनी लिहिले होते. नीरज यांनीच पुढे 'हेरा फेरी'चा सिक्वल अर्थात 'फिर हेरा फेरी'चं दिग्दर्शन केलं होतं.
कॉपी असूनही बनला कल्ट क्लासिक
'रामजी राव स्पीकिंग' हा चित्रपटही मल्याळम चित्रपटसृष्टीत खूप गाजला होता. त्यामुळे प्रियदर्शन यांनी कोणताही धोका न पत्करता, तीच कथा हिंदी प्रेक्षकांसमोर आणण्याचा निर्णय घेतला. 'हेरा फेरी' जरी दुसऱ्या चित्रपटाची कॉपी असली तरी, अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल यांच्या दमदार अभिनयामुळे आणि नीरज व्होरा यांनी लिहिलेल्या विनोदी संवादांमुळे या चित्रपटाला बॉलिवूडमध्ये 'कल्ट क्लासिक' चा दर्जा मिळाला, जो आजही प्रेक्षकांच्या आवडीचा आहे. अशाप्रकारे 'हेरा फेरी' सिनेमा हा रिमेक आहे, हे समजताच अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.