ज्याची भीती होती तेच घडतंय! 'हेरा फेरी ३' कधी बनणारच नाही? समोर आलं मोठं कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 19:41 IST2026-04-02T19:38:54+5:302026-04-02T19:41:14+5:30
बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय कॉमेडी फ्रँचायझी 'हेरा फेरी'च्या तिसऱ्या भागाची चाहते गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षा करत आहेत. मात्र, आता या चित्रपटाबाबत एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे

ज्याची भीती होती तेच घडतंय! 'हेरा फेरी ३' कधी बनणारच नाही? समोर आलं मोठं कारण
बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय कॉमेडी फ्रँचायझी 'हेरा फेरी'च्या तिसऱ्या भागाची चाहते गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षा करत आहेत. मात्र, आता या चित्रपटाबाबत एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. चित्रपटाच्या हक्कांवरून कायदेशीर लढाई सुरू असतानाच आता या चित्रपटाच्या लेखकाने प्रोजेक्टमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.
लेखकाची तडकाफडकी एक्झिट
चित्रपटाचे लेखक रोहन शंकर यांनी न्यूज १८ ला दिलेल्या मुलाखतीत 'हेरा फेरी ३'च्या अनिश्चित भविष्याबाबत धक्कादायक गौप्यस्फोट केला असून कायदेशीर लढायांमध्ये हा चित्रपट अडकल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल या त्रिकुटाला पुन्हा एकदा पडद्यावर एकत्र पाहण्याचे चाहत्यांचे स्वप्न पूर्ण होणार की नाही, असा सर्वांना प्रश्न पडला आहे.
रोहन शंकर यांनी सांगितले की, कायदेशीर गुंतागुंतीमुळे चित्रपटाचे काम सध्या ठप्प आहे. ते म्हणाले की, या संदर्भात त्यांची प्राथमिक चर्चा झाली होती आणि सर्व काही नियोजनानुसार घडणार होते, परंतु कायदेशीर कारणांमुळे प्रक्रियेत अडथळे आले. जर हे प्रश्न सुटले आणि दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी दिग्दर्शनाची धुरा सांभाळली, तरच मी या चित्रपटाचा भाग असेन, असे संकेतही त्यांनी दिले आहेत.
रोहन शंकर यांनी माहिती दिली की, प्रियदर्शन सध्या अनेक मोठ्या प्रकल्पांमध्ये व्यग्र आहेत. त्यांनी नुकतेच 'भूत बंगला' आणि 'हैवान' यांसारख्या चित्रपटांचे चित्रीकरण पूर्ण केले असून, आता ते मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांच्या १०० व्या ऐतिहासिक चित्रपटावर काम करणार आहेत. अक्षय कुमार आणि प्रियदर्शन हे दोघेही कामाच्या बाबतीत कमालीचे शिस्तप्रिय असून, ते एका मागोमाग एक चित्रपट करण्यावर भर देतात. अशा परिस्थितीत 'हेरा फेरी ३' चे कायदेशीर प्रश्न नेमके कधी सुटणार आणि या चित्रपटाचं शूटिंग कधी सुरु होणार, याबाबत कोणाकडेही ठोस उत्तर नाही.
रोहन शंकर यांच्या मते, प्रियदर्शन हे 'वर्कहॉलिक' असून ते 'हेरा फेरी ३' चित्रपटाच्या कायदेशीर निकालाची वाट पाहत रिकामे बसणार नाहीत. 'हेरा फेरी ३' सुरू होण्यापूर्वी कदाचित ते आणखी पाच चित्रपट बनवून पूर्ण करतील, अशी शक्यताही त्यांनी वर्तवली आहे.
२००० मध्ये प्रदर्शित झालेला 'हेरा फेरी' आणि २००६ मधील 'फिर हेरा फेरी' या दोन्ही चित्रपटांनी प्रेक्षकांना खळखळून हसवले होते. आता या तिसऱ्या भागाच्या संहितेपासून ते हक्कांपर्यंत सर्वच बाबी वादाच्या भोवऱ्यात सापडल्याने, 'राजू, श्याम आणि बाबूराव' यांची ही जोडी पुन्हा कधी पडद्यावर धिंगाणा घालणार, यावर सध्या काहीच स्पष्ट नाही.