धर्मेंद्र यांच्या निधनानंतर हेमा मालिनींना वाटतेय 'या' गोष्टीची खंत, म्हणाल्या -"त्यांच्या कुटुंबाचा..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 13:58 IST2025-12-01T13:52:41+5:302025-12-01T13:58:02+5:30
धर्मेंद्र यांचं एक खास स्वप्न अपूर्णच राहिलं. याशिवाय धर्मेंद्र यांचे अंत्यसंस्कार खासगी पद्धतीने एक मोठी गोष्ट घडली, याची खंत हेमा मालिनींनी व्यक्त केली.

धर्मेंद्र यांच्या निधनानंतर हेमा मालिनींना वाटतेय 'या' गोष्टीची खंत, म्हणाल्या -"त्यांच्या कुटुंबाचा..."
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं २४ नोव्हेंबर रोजी वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले. धर्मेंद्र यांच्या पार्थिवावर देओल कुटुंबाने खासगी पद्धतीने अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे अनेक चाहत्यांची निराशा झाली. आता याचविषयी धर्मेंद्र यांच्या पत्नी आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांनी खंत व्यक्त केली आहे. चित्रपट निर्माते हमद अल रेयामी यांनी हेमा यांची भेट घेतली. त्यावेळी हेमा यांच्यासोबत झालेल्या भावनिक संवादाचा हमीद यांनी खुलासा केला.
धर्मेंद्र यांचे अंतिम दिवस अत्यंत वेदनादायी
हमद अल रेयामी यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली आहे. यात ते सांगतात की, हेमा मालिनी खूप दुःखी होत्या आणि त्यांना अश्रू आवरणे कठीण झाले होते. याशिवाय धर्मेंद्र यांच्या असंख्य चाहत्यांना अभिनेत्याचं अंतिम दर्शन घेता आलं नाही, याची खंत हेमा मालिनींना सतावत आहे.
याबद्दल हेमा मालिनी म्हणाल्या, "धर्मेंद्र यांना त्यांच्या संपूर्ण आयुष्यात कधीही स्वतःला इतरांसमोर आजारी अवस्थेत दाखवायचं नव्हतं. त्यांनी आपली वेदना जवळच्या नातेवाईकांपासूनही लपवली. आणि एका व्यक्तीच्या निधनानंतर, अंतिम निर्णय कुटुंबालाच घ्यावा लागतो."
पुढे त्या अत्यंत दुःखाने म्हणाल्या, "जे झाले ते एका दृष्टीने त्यांच्यासाठी चांगले होते. कारण हमद, तुम्ही त्यांना त्या अवस्थेत पाहू शकला नसतात. त्यांचे अंतिम दिवस अत्यंत वेदनादायक होते आणि आम्हालाही त्यांना त्या परिस्थितीत पाहणे खूप कठीण झाले होते."
धर्मेंद्र यांची ही इच्छा अपूर्णच
धर्मेंद्र यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक सुंदर कविता आणि लेख प्रकाशित लिहिले होते. पण ते प्रकाशित केले नव्हते. याबद्दलही हेमा मालिनी यांनी खंत व्यक्त केली. "आता अनोळखी लोक त्यांच्याबद्दल लिहितील... पुस्तके तयार करतील... पण धर्मेंद्र यांनी स्वतः लिहिलेले शब्द कधीही प्रकाशझोतात आले नाहीत. त्यांंचं ते स्वप्न अपूर्णच राहिलं." अशा भावूक शब्दात हेमा मालिनींनी भावना व्यक्त केलाय.