ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात धर्मेंद्र यांच्याकडे दुर्लक्ष, हेमा मालिनींचा संताप, म्हणाल्या- "ही लाजीरवाणी गोष्ट..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 11:39 IST2026-03-17T11:34:54+5:302026-03-17T11:39:50+5:30
ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात महान अभिनेते धर्मेंद्र यांना श्रद्धांजली देण्यात आली नाही. या दुर्लक्षावर आता धर्मेंद्र यांची पत्नी हेमा मालिनी आणि मुलगी ईशा देओल यांनी आपली परखड मतं मांडली आहेत.

ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात धर्मेंद्र यांच्याकडे दुर्लक्ष, हेमा मालिनींचा संताप, म्हणाल्या- "ही लाजीरवाणी गोष्ट..."
९८ व्या ॲकॅडमी अवॉर्ड्स (Oscars 2026) सोहळ्यात जगातील अनेक दिग्गज कलाकारांना श्रद्धांजली वाहण्यात आली, मात्र बॉलिवूडचे 'ही-मॅन' धर्मेंद्र यांना 'इन मेमोरिअम' (In Memoriam) विभागात स्थान न मिळाल्याने त्यांचे चाहते आणि कुटुंबीय प्रचंड नाराज झाले आहेत. या दुर्लक्षावर आता धर्मेंद्र यांची पत्नी हेमा मालिनी आणि मुलगी ईशा देओल यांनी आपली परखड मतं मांडली आहेत.
हेमा मालिनी यांची प्रतिक्रिया
बॉलिवूडची 'ड्रीम गर्ल' हेमा मालिनी यांनी ऑस्करच्या या कृत्यावर नाराजी व्यक्त करताना म्हटले की, "एवढ्या मोठ्या जागतिक स्तरावर धर्मेंद्रजींसारख्या महान कलाकाराकडे दुर्लक्ष करणे ही लाजीरवाणी गोष्ट आहे. जगभरातील त्यांचे चाहते त्यांना ओळखतात. पण मुळात धरमजींना कधीच पुरस्कारांची फारशी पर्वा नव्हती. त्यांना त्यांच्या हयातीतही फारसे पुरस्कार मिळाले नाहीत. त्यांना केवळ भारतातील जनतेचं प्रेम हवं होतं आणि ते त्यांना भरभरून मिळालं."
ईशा देओल काय म्हणाली?
धर्मेंद्र यांची मुलगी ईशा देओल हिने 'व्हरायटी इंडिया'शी बोलताना सांगितले की, "मला नाही वाटत की ऑस्करने उल्लेख न केल्यामुळे माझ्या बाबांना काही फरक पडला असता. त्यांचे हृदय खूप मोठे होते आणि अशा गोष्टींची त्यांना चिंता नसायची. त्यांच्यासाठी जीवन म्हणजे प्रसिद्धी किंवा लोकप्रियता नव्हती, तर लोकांच्या हृदयात असलेले स्थान आणि प्रेम त्यांच्यासाठी महत्वाचं होतं."
चाहत्यांमध्ये संताप
सोशल मीडियावर धर्मेंद्र यांच्या चाहत्यांनी ऑस्कर पुरस्कार सोहळ्यावर टीकेची झोड उठवली आहे. एका चाहत्याने लिहिले, "ज्या माणसाने सिनेमासाठी ६० वर्षे दिली, त्यांना श्रद्धांजली न देणे हा भारतीय सिनेमाचा अपमान आहे." काही नेटिझन्सनी असेही म्हटले की, ऑस्कर हा केवळ हॉलिवूडचा पीआर शो बनला असून तो खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय नाही.
बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचे २४ नोव्हेंबर २०२५ रोजी वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण भारतीय चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली होती. नुकत्याच झालेल्या 'बाफ्टा' (BAFTA) पुरस्कारांमध्ये धर्मेंद्र यांना विशेष श्रद्धांजली वाहण्यात आली होती, ज्याचे हेमा मालिनी यांनी कौतुक केले होते. मात्र, ऑस्करसारख्या मुख्य सोहळ्यात धर्मेंद्र यांच्या नावाचा समावेश न केल्याने भारतीय चाहत्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे.