'बलात्कार करणाऱ्या आरोपींना भरचौकात फाशी द्या', कंगना राणौतने व्यक्त केला संताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2021 18:47 IST2021-01-09T18:46:48+5:302021-01-09T18:47:08+5:30
सामूहिक बलात्कार करणाऱ्या आरोपींना भर चौकात फाशी दिली पाहिजे, असे मत कंगनाने व्यक्त केले आहे.

'बलात्कार करणाऱ्या आरोपींना भरचौकात फाशी द्या', कंगना राणौतने व्यक्त केला संताप
बॉलिवूडची क्वीन कंगना रणौत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असते. पुन्हा एकदा ती वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आली आहे. तिने मुलींवर होणाऱ्या अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर हे विधान केले आहे. सामूहिक बलात्कार करणाऱ्या आरोपींना भर चौकात फाशी दिली पाहिजे, असे मत कंगनाने व्यक्त केले आहे.
ती सध्या भोपाळमध्ये तिच्या आगामी चित्रपट 'धाकड'चे शूटिंग करते आहे. यावेळी तिने घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
कंगना राणौत पत्रकार परिषदेत म्हणाली की, देशातील अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या आरोपींना जोपर्यंत भर चौकात लटकवले जात नाही, तोपर्यंत अत्याचार थांबणार नाहीत. त्या अनुषंगाने कडक कारवाई करत पाच-सहा उदाहरणे समाजासमोर ठेवली पाहिजेत.
ती पुढे म्हणाली की, सौदी अरबमधील कित्येक देशांत आजही बलात्कार करणाऱ्या आरोपीला भर चौकात लटकवले जाते. अशा कायद्यांची भारतालाही गरज आहे. त्यासाठी भारताच्या जुन्या कायद्यांत बदल करावा. गुन्हा सिद्ध करण्याची जबाबदारी पीडितेवर असल्याने बऱ्याचदा आरोपी कायदेशीर कचाट्यातून सुटतो. त्यामुळे कायदे आणखी कडक करण्याची गरज आहे.
सध्या उत्तरप्रदेश आणि कर्नाटक राज्यात लव्ह जिहाद कायदा लागू केला आहे. या कायद्याला कंगना रणौतने आपलं समर्थन दिले आहे. यावेळी ती म्हणाली की, लव्ह जिहाद कायदा चांगला आहे. हा कायदा केवळ त्यांच्यासाठी आहे, जे लव्ह जिहाद करतात. तसेच आंतरजातीय विवाहात धोका देणाऱ्या व्यक्तींसाठी हा कायदा आहे.