नितेश तिवारींच्या 'रामायण'वर टीव्हीच्या राम-सीताची प्रतिक्रिया, म्हणाले- "एवढीच अपेक्षा आहे की..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 16:39 IST2025-08-04T16:38:53+5:302025-08-04T16:39:33+5:30
एकेकाळी रामसीताची भूमिका साकारून प्रसिद्धी मिळवलेल्या गुरमीत आणि देबीनाने आता 'रामायण' सिनेमाबाबत भाष्य केलं आहे.

नितेश तिवारींच्या 'रामायण'वर टीव्हीच्या राम-सीताची प्रतिक्रिया, म्हणाले- "एवढीच अपेक्षा आहे की..."
नितेश तिवारींच्या 'रामायण' सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या सिनेमाची पहिली झलकही समोर आली आहे. 'रामायण'मध्ये प्रभू श्री रामाच्या भूमिकेत रणबीर कपूर तर सीता मातेच्या भूमिकेत साई पल्लवी दिसणार आहे. टीव्हीवरील 'रामायण' ही मालिकाही प्रचंड गाजली होती. या मालिकेत अभिनेता गुरमीत चौधरी आणि अभिनेत्री देबिनाने रामसीताची भूमिका साकारली होती. त्यांची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. रामसीताची भूमिका साकारलेले गुरमीत आणि देबिना खऱ्या आयुष्यातही पतीपत्नी आहेत.
एकेकाळी रामसीताची भूमिका साकारून प्रसिद्धी मिळवलेल्या गुरमीत आणि देबीनाने आता 'रामायण' सिनेमाबाबत भाष्य केलं आहे. गुरमीत म्हणाला, "मला या गोष्टीचा आनंद आहे की रणबीर प्रभू श्री राम यांची भूमिका साकारत आहे. तो एक चांगला अभिनेता आहे. नितेश तिवारी हा सिनेमा दिग्दर्शित करत आहेत. ते खूप सेन्सिबल व्यक्ती आहेत. ज्याप्रकारे हा सिनेमा बनवला जात आहे. माझी हीच अपेक्षा आहे जास्तीत जास्त लोकांना आपल्या संस्कृतीबद्दल माहिती मिळू दे. आणि रामायणची कथा केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगात बघितली गेली पाहिजे. त्यामुळे मला वाटतं ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट असली पाहिजे".
देबिना म्हणाली, "साई पल्लवी ही एक हुशार अभिनेत्री आहे. आम्ही नुकतेच तिचे काही सिनेमे पाहिले. तिचं कास्टिंग योग्य आहे. तिच्याकडे तो निरागस आणि तेज असणारा चेहरा आहे. रामायण बनत राहिलं पाहिजे. लोक नात्यांची किंमत विसरत चालले आहेत. आता ते पुस्तकं वाचत नाहीत. त्यामुळे लोक जे मीडियम फॉलो करतात. त्याच मीडियममधून त्यांना रामायणाबाबत शिकवण दिली गेली पाहिजे".
दरम्यान, नितेश तिवारींच्या रामायण सिनेमासाठी प्रेक्षकांना आणखी थोडी वाट पाहावी लागणार आहे. हा सिनेमा २०२६च्या दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रामायणमध्ये रणबीर कपूर, साई पल्लवी यांच्यासह लारा दत्ता, रवी दुबे, यश, आदिनाथ कोठारे यांच्याही मुख्य भूमिका असणार आहेत.