भरदिवसा मंदिराबाहेर गोळ्या झाडल्या अन्...; गुलशन कुमार हत्येप्रकरणातील आरोपीचा मृत्यू! 'त्या' घटनेने हादरलेला देश
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 14:22 IST2026-01-10T14:14:35+5:302026-01-10T14:22:31+5:30
Abdul Rauf Merchant Death: गुलशन कुमार हत्या प्रकरणी मोठी अपडेट! आरोपीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

भरदिवसा मंदिराबाहेर गोळ्या झाडल्या अन्...; गुलशन कुमार हत्येप्रकरणातील आरोपीचा मृत्यू! 'त्या' घटनेने हादरलेला देश
Gulshan Kumar Murder Accuse Death: ख्यातनाम संगीत दिग्दर्शक, चित्रपट निर्माते व टी सीरिजचे सर्वेसर्वा, 'कॅसेटकिंग' म्हणून ओळखले जाणारे गुलशन कुमार यांच्या हत्येने संपूर्ण देश हादरला होता. गुलशन कुमार यांची १२ ऑगस्ट १९९७ रोजी मुंबईत हत्या करण्यात आली होती. अंधेरीतील एका मंदिरामध्ये पूजा करून बाहेर पडल्यानंतर त्यांच्यावर भरदिवसा गोळ्या झाडण्यात आल्या. याप्रकरणी पोलीस तपासानंतर अब्दुल उर्फ रौफ मर्चंट (Abdul Rauf Merchant) या आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आणि त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. याच आरोपी अब्दुल मर्चंटचा गुरुवारी सकाळी हरसूल कारागृहात मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ३० डिसेंबर च्या दिवशी आरोपी अब्दुलला शहरातील सरकारी व्हॅली रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर, त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देऊन पुन्हा तुरुंगात पाठवण्यात आले. मात्र, गुरुवारी त्याला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्याला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
कोण होता अब्दुल मर्चंट?
अब्दुल मर्चंट हा अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमचा जवळचा साथीदार आणि शार्प शूटर होता. तपासातून असे समोर आले की, गुलशन कुमार यांची हत्या अबू सालेमच्या सांगण्यावरून करण्यात आली होती.यावेळी अशीही माहिती समोर आली होती की, गुलशन कुमार यांच्याकडे खंडणीची मागणी करण्यात आली होती, जी त्यांनी देण्यास नकार दिला होता.
कुमार यांच्या हत्येनंतर रौफ फरारी झाला होता. २००१ मध्ये त्याला अटक करण्यात आली. त्यानंतर २००९ मध्ये फर्लो मंजूर करण्यात असताना मर्चंट बांगलादेशात पळून गेला होता. कोणत्याही वैध कागदपत्रांशिवाय देशात प्रवेश केल्यामुळे त्याला बांगलादेशात अटक करण्यात आली आणि पाच वर्षे कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. पहिल्या शिक्षेची पूर्तता केल्यावर दहशतवादी संबंधांवरून डिसेंबर २०१४ मध्ये त्याला पुन्हा अटक करण्यात आली.